निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात दरोडा टाकणाऱ्या तीन संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. या टोळीतील चार जण रायगड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

म्हाळसाकोरे शिवारात चोरट्यांनी राजेंद्र मुरकुटे यांच्या घरात प्रवेश करून कुटूंबियांना कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, कपाटातील पैसे असा तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथकांना सूचना दिल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर, सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास ढोकरे यांच्या पथकाने गुन्ह्यातील तक्रारदार, साक्षीदार व प्रत्यदर्शीने केलेल्या वर्णनावरून तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या पुराव्यांच्या तांत्रिक विश्लेषण आधारे विशाल बनसोडे (२३, रा. सायने), दिलीप चव्हाण (३०, रा. सोमठाणे), राहुल चव्हाण (२५, रा. कुटे वस्ती) यांना ताब्यात घेतले.

त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी रायगड आणि मालेगाव येथील साथीदारांसह रात्री दुचाकीवर येत वस्तीवरील घरांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करत कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरल्याची कबुली दिली. परिसरातील चार ते पाच घरांमध्ये लूट केल्याचेही त्यांनी कबूल केले.

दरम्यान, अजय चव्हाण (रा. असारे), आकाश चव्हाण (रा. होराळे), सोमनाथ चव्हाण (रा. भिलवली) हे त्यांचे अन्य साथीदार रायगड पोलिसांच्या ताब्यात असून रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण (रा. मालेगाव) हा फरार आहे.

संशयित सराईत गुन्हेगार

सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मुंबई, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापूर, ठाणे या जिल्ह्यांमधील विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी, दंगा, दुखापत, अपहरण यासारखे २३ गुन्हे दाखल आहेत. संशयित हे भाजी विक्री, भ्रमणध्वनीच्या सुट्या भागांची विक्री, गृहोपयोगी वस्तु विक्रीच्या बहाण्याने दुचाकीवर फिरत असत. खेडेगावातील वस्त्यांवरील घरांची पाहणी करुन नंतर गुन्हा करत असत.

युवावर्गाची मदत

म्हाळसाकोरे परिसरात गुन्ह्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. यासाठी ग्रामसभेत हा विषय मांडत युवावर्गाची मदत घेण्यात आली. संशयित सराईत गुन्हेगार असून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. – बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा)