मालेगाव : नाशिक जिल्ह्यात गुंडगिरी व अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरू असताना, नोकरीच्या आमिषाने एका तरुणाला १८ लाखांचा गंडा घालणारे दोघे संशयीत शिक्षक महिन्याभरापासून मोकाट फिरत आहे. यासंदर्भात सटाणा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीतांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होत आहे.

एकीकडे गुंडगिरी विरोधातील मोहिमेद्वारे ‘नाशिक जिल्हा, कायद्याच्या बालेकिल्ला’ अशी ओळख निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असताना दुसरीकडे संशयीत आरोपींना पोलिसांकडूनच अभय दिले जात आहे की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील दत्तू बोरसे या शेतकऱ्याने यासंदर्भात सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बोरसे यांचा मुलगा मोहन यास अनुदानित शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुंदन देवरे व धनंजय कापडणीस या दोघांनी रोख स्वरूपात आणि बँक खात्यांद्वारे एकूण १८ लाख रुपये उकळले. देवरे हा बोरसे यांचा नातेवाईक असून तो पेशाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे.

तर,कापडणीस हा मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे देवरे याने भासविले होते, परंतु तो अधिकारी नसून आश्रम शाळेत शिक्षक असल्याचे काही दिवसांनी बोरसे यांच्या निदर्शनास आले. तसेच सांगितल्याप्रमाणे दोन अडीच वर्ष प्रतीक्षा करूनही मुलाला नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची बोरसे यांची भावना झाली.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर बोरसे यांनी पैसे परत मिळविण्यासाठी उभयतांकडे लकडा लावला. तेव्हा कापडणीस व देवरे यांनी अनुक्रमे १० लाख व ५ लाख रुपये या प्रमाणे दोन वेगवेगळे धनादेश बोरसे यांना दिले. तसेच फोन पे आणि बँक खात्याद्वारे उभयतांनी ६ लाख ९६ हजार रुपये परत केले. १८ लाखापैकी ६ लाख ९६ हजाराची रक्कम परत मिळाली तरी ११ लाख ४ हजार रुपये येणे बाकी असल्याने बोरसे यांनी मिळालेले दोन्ही धनादेश बँकेत भरले. मात्र उभयतांच्या बँक खात्यात परेशी रक्कम शिल्लक नसल्याने हे धनादेश वटू शकले नाहीत. यानंतर बोरसे यांनी गेल्या २२ सप्टेंबर रोजी दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल होऊन महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी दोघा संशयीतांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. पोलीस दप्तरी हे दोघे जण फरार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यानच्या काळात यातील एक संशयीत कुंदन देवरे याने मालेगाव येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याचे बोरसे यांचे वकील मनोज पवार यांनी सांगितले. असे असताना संशयीतांना अटक करण्यात पोलिसांना यश का येत नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शेत विकून पैसे भरले..

महालपाटणे शिवारात बोरसे यांची दीड एकर शेत जमीन होती. शिकलेल्या मुलाला नोकरी मिळेल व आपल्याला चांगले दिवस येतील, या अपेक्षेने त्यातील एक एकर जमिनीची त्यांनी विक्री केली व त्यापोटी मिळालेले पैसे त्यांनी उभयतांना दिले. शेती व्यवसायावरच बोरसे कुटुंबाचा उदारनिर्वाह अवलंबून आहे. परंतु दीड पैकी अर्धाच एकर शेतजमीन आता त्यांच्याकडे शिल्लक राहिली आहे. नोकरीच्या अपेक्षेमुळे शेती गेली, मुलाला नोकरीही मिळाली नाही व संपूर्ण पैसेही परत मिळाले नसल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न बोरसे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.