नाशिक : २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु असून हा कुंभमेळा सुरक्षिततेच्या दृष्टीने उच्चतंत्रज्ञानयुक्त होणार आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी, भाविकांना घाटापर्यंत सुलभपणे पोहचता यावे, वाहनतळावर नजर ठेवता यावी, अशा सर्व व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नाशिकपेक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याची तयारी हे पोलीस यंत्रणेसमोरील आव्हान असून त्यासाठी आतापासूनच ग्रामीण पोलिसांकडून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी, तंबूंना लागलेली आग, अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडणे, हे यंत्रणेसमोरील आव्हान आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासंदर्भात कोणकोणती तयारी करण्यात येत आहे, यासंदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली.
मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत ग्रामीण पोलिसांकडून गर्दीचे विकेंद्रीकरण कसे होईल, यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी २१०० मीटरचा घाट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कुशावर्तावरील गर्दी नियंत्रित होण्यास मदत होऊ शकेल. कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात एआयवर आधारित कॅमेऱ्यांची गर्दीवर नजर राहणार असून या नजरेतून संशयित सुटू शकणार नाहीत. या कॅमेऱ्यांमुळे कोणत्या ठिकाणी अधिक गर्दी होत आहे, वाहतुकीला अडथळा होत आहे काय, वाहतळावर काय स्थिती आहे, याची सर्व माहिती त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना आधीच भ्रमणध्वनीवर मिळू शकणार आहे. त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतील.
कुंभमेळ्यास येणाऱ्या अफाट गर्दीत समाजकंटक, गुन्हेगार, संशयास्पद व्यक्ती ओळखणे हे आव्हान आहे. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. संशयास्पद अशा सुमारे ८० हजार जणांची चेहरा ओळख असलेली माहिती सध्या पोलिसांकडे उपलब्ध आहे. त्यात यापुढेही भर टाकण्याचे काम करण्यात येत आहे. कुंभमेळ्यात अनेक अतीमहत्वाच्या व्यक्ती भेट देत असतात. कुंभमेळ्यात आधीच गर्दी आणि त्यात अशा व्यक्तींच्या सुरक्षेकडे लक्ष देणे क्रमप्राप्त असल्याने त्यांना व्यवस्थितरित्या दर्शन, स्नान करता यावे आणि त्यांच्यामुळे भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी अतीमहत्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रयागराज येथील कुंभमेळा नियोजनाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्याने कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्था चोख असावी, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील व्यवस्थेचे उदाहरण डोळ्यासमोर असल्याने त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्था चोख असावी, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा)