नाशिक : पांढुर्ली शिवारात सिन्नर-घोटी महामार्गाजवळील अर्पण बिअर शॅापी आणि याआधी कोनांबे येथील बिअर शॉपी या दुकानांमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले.
पांढुर्ली शिवारातील अर्पण बिअर दुकानाचे वरचे पत्रे कापून बिअरचे खोके आणि रोख रक्कम असा ३५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. चंद्रकांत वाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कोनांबे शिवारातील यशराज बिअर बारचे शटर वाकवून विदेशी दारु तसेच रोख रक्कम असा ३५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला.
याशिवाय २१ एप्रिल रोजी कोनांबे शिवारातीलच ग्रीन रॅायल बिअर दुकानाचे शटर तोडून विदेशी दारु आणि रोख रक्कम असा ६८ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. एकाच परिसरात तीन बिअर बारमध्ये चोऱ्या झाल्याने तीन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता, संशयितांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर यंत्रणादेखील चोरल्याने घटनास्थळावर कुठलाही पुरावा उपलब्ध नव्हता.
पथक तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मगर यांना हे गुन्हे नोंदीतील सराईत गुन्हेगार हसन कुट्टी (रा. पंचवटी) याने त्याच्या साथीदारांबरोबर केल्याची माहिती मिळाली. गुन्हेगार शनिवारी जेलरोड परिसरात येणार असल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने जेलरोड परिसरात सापळा रचला. हसन कुट्टी यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. गुन्ह्यातील एक जण फरार आहे. हसन कुट्टी (४५, रा. नवनाथ नगर) यास सिन्नर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. हसन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी महाराष्ट्रासह परराज्यात ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.