नाशिक : सिन्नरसह जिल्ह्यातील सर्वं औद्योगिक वसाहत परिसर भयमुक्त करण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलले जातील. उद्योजकांना पुरेसे संरक्षण देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील, अशी ग्वाही जिल्हा(ग्रामीण)पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सिन्नरसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कायदा व सुव्यवस्था स्थिती अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने निमाच्या पुढाकाराने सिन्नर निमा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, एमआयडीसी उपअभियंता संदीप भोसले, उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, सुधीर बडगुजर, किरण वाजे आदी होते.

महानगरपालिका क्षेत्रात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही जी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याचे कौतुक करून नाशिक जिल्हा आणि विशेषतः औद्योगिक वसाहत परिसरात ही मोहीम राबवून दहशत निर्माण करणारे गुंड, खंडणीखोर आणि समाजकंटकांना चांगला धडा शिकवा, असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. उद्योजकांनी सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा, या वसाहतीत रात्रीची गस्त व पोलीस कुमक वाढवावी, सर्वत्र सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना करावी आदी मागण्या केल्या.

उद्योजकांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले. जर कोणी खंडणी मागत असेल तर, उद्योजकांनी न घाबरता स्वतः अथवा निमाच्या माध्यमातून पुढे येऊन तक्रार दाखल करावी, आम्ही अशा प्रवृत्तींचा वेळीच बिमोड करू, असेही पाटील सूचित केले. यावेळी किरण जैन, सचिन कंकरेज, मिलिंद राजपूत, एस के नायर, रवी पुंडे, विश्वजीत निकम, अजय जैन, संजय राठी, रवी राठोड, रणजीत सानप, अनिल मंत्री आदी उद्योजक उपस्थित होते.