नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यात बुडाल्याने तिघांचा तर, एकाचा कोरड्या विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.चांदवड तालुक्यातील देवगण महाले (३०, रा. नवापूर पारेगाव) हे स्वत:च्या विहिरीत काही कामासाठी उतरत असतांना हात सुटल्याने ते कोरड्या विहिरीत पडले. त्यांना नाशिक येथे आणत असतांना ते वाटेतच बेशुध्द झाल्याने ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. डॉ. प्राची पवार यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना बागलाण तालुक्यात घडली. दऱ्हाणे येथील लखन मावळे (१९) हा गावातील उमेदसिंग माले यांच्या शेतातील विहिरीत पडला. परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून न आल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. ग्रामस्थांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेने सटाणा येथे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना मालेगाव तालुक्यात घडली. हर्षल चव्हाण (१८, रा. संजय गांधीनगर) हा सकाळी सातमाने शिवारातील ओहळात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्याला बाहेर काढले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. चौथी घटनाही मालेगाव तालुक्यातीलच आहे. मनेश खैरनार (२०) हा स्वत:च्या शेतातील विहिरीत बेशुध्द अवस्थेत आढळला. त्याला मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.