नाशिक : शहरातील दान पारमिता फाउंडेशन यांच्या वतीने अशोक स्क्रिप्ट इन्स्टिट्यूट अंतर्गत सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्ट रोजी विश्व धम्म लिपी गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
जगात वेगवेगळ्या भाषा आणि लिपींचा अभ्यास, त्यांचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी त्या त्या भाषा, लिपीसंदर्भातील मान्यवरांकडून पैसाही उपलब्ध करुन देण्यात येत असतो. काही लिपींच्या अभ्यासातून त्या त्या देशाचा इतिहास समजण्यास मदत होत असते. इतिहासाची एक वेगळी बाजू सर्वासमोर येते. धम्मलिपी ही त्यापैकीच एक आहे. सर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश अधिकाऱ्याने सर्वात अगोदर धम्म लिपीची वर्णमाला तयार केली. शिलालेखांचे माहिती संकलन (डॉक्युमेंटेशन) केले. सम्राट अशोक भारत भूमीत होऊन गेल्याविषयी त्यांनी यासंदर्भात अधिक संशोधन केले. मातीखाली दडलेल्या बौद्ध इतिहासाला प्रकाशात आणण्याचे आणि मृतावस्थेत असलेल्या धम्म लिपीला पुनर्जीवित करण्याचे कार्य सर जेम्स प्रिन्सेप यांनी केले. त्यामुळे त्यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिवस दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विश्व धम्मलिपी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पाच वर्षांपासून दान पारमिता फाउंडेशन संस्थेच्या वतीने धम्मलिपीच्या प्रसार आणि प्रचारार्थ निःशुल्क वर्ग दर महिन्याला ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना धम्मलिपी शिकवून झाल्यावर त्यांची एका लेणींवर कार्यशाळा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांकडून धम्मलिपीत असलेल्या शिलालेखाचे वाचन करून घेतले जाते. धम्मलिपी शिकल्याचे प्रमाणपत्र लेणींच्या ठिकाणी कार्यक्रमात दिले जाते.
शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत विश्व धम्मलिपी गौरव दिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. प्रसिद्ध वक्त्या व परिवर्तनवादी चळवळीच्या अभ्यासक प्रा. जयश्री खरे-बागूल यांच्या अध्यक्षतेखाली विश्व धम्मलिपी गौरव दिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात बौद्ध साहित्य संस्कृतीचे अभ्यासक, लेखक, धम्मलिपीतज्ज्ञ अतुल भोसेकर, लोककवी डॉ. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक या संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा समग्र:लोककवी डॉ.वामनदादा कर्डक साहित्याचे संपादक प्रा. शरद शेजवळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील नागार्जुन वाडेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विश्व धम्मलिपी गौरव दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मलिपीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, दान पारमिता फाउंडेशनचे सर्व संचालक प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने संस्थापक सुनील खरे, संतोष अंभोरे, प्रवीण जाधव, रूपाली गायकवाड यांनी केले आहे.