नाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक तसेच नाशिकरोडसह इतर भागात निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शनिवारी मिरवणूक मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजेपासून मुख्य मिरवणूक मार्गासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसेच निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीचा बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील.

लाडक्या गणरायाला शनिवारी निरोप दिला जाणार आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीला वाकडी बारव अर्थात चौक मंडईतून सुरुवात होईल. नंतर जहांगिर मशिद, दादासाहेब फाळके रस्ता, दूध बाजार चौक, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रस्ता, मेहेर, अशोक स्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरिया रस्त्याने कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण असा हा मार्ग आहे. या मार्गावर सकाळ दहा वाजेपासून मिरवणुकीतील वाहने वगळता अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

निमाणीऐवजी पंचवटी डेपोतून शहर बस

या काळात निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीचा बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील. ओझऱ्, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बसेस व सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पुलावरून द्वारका चौक, नाशिकरोड वा शहरात इतर ठिकाणी जातील. पंचवटीकडे येणारी वाहने द्वारका चौकातून कन्नमवार मार्गे पूल येतील. रविवार कारंजा, अशोक स्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील. वाहनचालक हे दिंडोरी नाका, पेठ नाका, मखमलाबाद नाका, बायजाबाई छावणी, रामवाडी, चोपडा लॉन्स मार्गे इतरत्र जातील.

नाशिकरोड भागातील निर्बंध

नाशिकरोड विभागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वीर सावरकर उड्डाण पूल नाशिकरोड खालून जाणारी व येणारी दोन्ही बाजुकडील वाहतूक दत्त मंदिर चौक सिग्नल ते सिन्नर फाट्यापर्यंत बंद राहणार आहे. विहितगावकडून बिटको चौकाकडे जाणारी व येणारी जड, अवजड वाहतुकीलाही प्रवेश बंद असणार आहे. या काळात शहर बस वाहतुकीच्या बसेस दत्त मंदिर सिग्नल पर्यंत येतील आणि जातील. सिन्नर, पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस व इतर वाहने वीर सावरकर उड्डाण पुलावरून ये-जा करतील.

इतर भागातील नियोजन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी आनंदवली ते चांदशी गाव दरम्यानची वाहतूक मिरवणुकीतील वाहने वगळून अन्य वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्रिमूर्ती चौक, दत्ता मंदिर चौक येथून आयटीआय पुलाकडे जाणारी आणि आयटीआय पुलाकडून गाढवे पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे. नांदूर नाका व सैलानी बाबा चौक दरम्यानचा मार्ग दोन्ही बाजुने अन्य वाहतुकीसाठी बंद असेल. देवळाली कॅम्प भागात सिलेक्शन कॉर्नर, झेंडा चौक, जामा मशिद चौक, जुने बसस्टँड, सिलेक्शन कॉर्नर, संसरी नाका, संसरी गाव गिरणा नदीपर्यंत मिरवणूक मार्गावर अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.