नाशिक : आदिवासीबहुल सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षे वीज, पाणी, रस्ता, आरोग्य या समस्या कायम आहेत. याशिवात इतर अगदीच साध्या म्हणता येतील, अशा सुविधांपासून या तालुक्यांमधील अनेक गावे वंचित असून सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण हे त्यापैकीच एक. या गावात स्मशानभूमीला शेड नसल्याने अंत्यविधी करताना समस्या येतात. बुधवारी भर पावसात येथे वरुन ताडपत्री धरुन अंत्यविधी करावा लागला.
पेठ, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर रस्ते नसल्याने ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पुलाअभावी झाडांच्या फांद्यावरून तर कधी लाकडी फळीवरून ये-जा करावी लागते. आदिवासी बांधवाची अडथळ्यांची शर्यत सुरू असतांना मृत्युनंतरही यातना त्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसते. बुधवारी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवीपाडा येथे मोतीराम बागूल (६५) यांचा मृत्यू झाला. स्मशानभूमीला वरुन शेड नसल्याने पावसात ताडपत्रीखाली त्यांचा अंत्यविधी करावा लागला. राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे. चार वर्षात किमान १० वेळातरी पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आली आहे.
सुरगाणा तालुक्यात ६१ ग्रामपंचायती असून ३८१ गावे आणि पाडे आहेत. यातील १०५ ते ११० ठिकाणी स्मशानभूमीवर शेड नसल्याने उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे, जागा असली तरी वनविभागाचा अडथळा, अशा अडचणी येत आहेत. काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. गाव एकीकडे, स्मशानभूमी दुसरीकडे, अशीही अवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीतून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागतो. जिल्हा परिषदेतर्फे अनेक ठिकाणी कागदोपत्री खर्च दाखविण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे अनेक ग्रामसेवकांवर खाते अंतर्गत कारवाईही झाली आहे. अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेडसाठी पैसा खर्च करण्याची मागणी तालुक्यातील गावपाड्यातून होत आहे.
सामाजिक सुविधांची गरज
भरपावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे. राज्य शासनाने योग्य त्या सुविधा देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. लाेकप्रतिनिधींनी याबाबत पुढाकार घेत समस्या साेडवाव्यात. रमेश बागूल (चुली, ता. सुरगाणा)
ताडपत्रीखाली कधी ? कुठे अंत्यविधी ?
पिळूकपाडा ( २३ सप्टेंबर २०२१), साबरदरा (८ जुलै २०२२), केळीपाडा (१४ जुलै २०२२), उंबरदे (९ जुलै २०२३), पळशेत ( १८ जुलै २०२३), चंद्रपूर (५ सप्टेंबर २०२३), वावरपाडा (११ सप्टेंबर २०२४), बिजूरपाडा (२६ ऑगस्ट २०२४)