नाशिक – जिल्ह्यात आठवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस दोन दिवसांपासून सक्रिय झाल्याने त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्षानिमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यावर परिणाम झाला आहे. संततधार पावसामुळे स्वच्छताविषयक कामे आणि घाट परिसरात धार्मिक विधींना अडथळे येत आहेत.

बारा ज्योतिर्लिंगापैकी पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. परंतु, श्रावण महिना आणि पितृपक्षात देशभरातून धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत अधिक वाढ होते. पितृपक्षात त्रिपिंडी श्राध्द, तर्पण असे विधी केले जातात. शहरातील कुशावर्तासह अहिल्या-गोदा संगमाच्या ठिकाणी हे विधी होतात. येणारे भाविक मुक्कामी राहत असल्याने लाॅज, हाॅटेल, रिक्षा, टॅक्सी यांची कमाई वाढली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या अर्थकारणाला गती मिळत असतांना दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पूजा विधींमध्ये अडचणी येत आहेत.

बुधवारी दुपारी अवघ्या १५ मिनिटांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. बुधवारी एकादशीनिमित्त संत निवृत्तीनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांचेही पावसामुळे हाल झाले. घाटांवर पाणी जमा झाल्याने विधी करण्यात अडचणी आल्या. गुरुवारीही पाऊस कायम राहिल्याने परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. पावसामुळे सफाई कामाला अडथळे आल्याने शहराच्या मुख्य रस्त्यांवर कचरा पडून राहिला. गाळ आणि चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे.

गुरूवारी पहाटे पावसाचा जोर कमी होता. त्यावेळी भाविकांनी गंगाघाटावर तर्पण विधी केले. पिंड अर्पण करून पितरांचे स्मरण करण्यात आले. स्थानिक पंडा-पुजारींच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पडले. महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवून घाट परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या पावसामुळे त्यातही अडचणी आल्या.