नाशिक– बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा देवस्थानच्यावतीने केला जातो. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसत आहे. दर्शन व्यवस्थेत अकस्मात बदल केल्यामुळे उद्भवलेल्या वादात सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. तिथे पोलीस होते. या घटनेच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. परंतु, पोलीस दप्तरी याची कुठलीही नोंद झाली नाही.
त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. या उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात केला जातो. मधल्या काळात देवस्थानने ऑनलाईन देणगी दर्शनाची व्यवस्था केली. मात्र या व्यवस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत देवस्थानच्या ऑनलाईन देणगी दर्शन पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत देवस्थानला काही सूचना केल्या होत्या.
श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. शनिवारी व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने वाद उदभवला. यावेळी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे उपस्थित भाविकांना धक्का बसला. दर्शनासाठी आलेले काही जण दर्शन न घेताच माघारी परतले. सुरक्षारक्षकांच्या अरेरावीचा फटका अनेकदा भाविकांना बसतो. बाहेरगावहून येणारे भाविक अनेकदा तक्रार न करता माघारी निघून जातात. कोणी तसा प्रयत्न केला तर तक्रार घेतली जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहे.
या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले, हा प्रकार घडला, तेव्हा मुखदर्शन व्यवस्था बंद करण्यात आली होती. मुख दर्शनमुळे गर्दी नियंत्रणात होती. भाविकांचा संताप होत असतांना आम्ही तसेच सुरक्षारक्षकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मुख्य दरवाजाला लाथा मारल्याने पुढील प्रकार घडला. मात्र नंतर देवस्थानचे कर्मचारी आणि भाविक यांच्या बोलणे झाले. भाविकांनीही काही तक्रार केली नाही. ते मारहाण प्रकरण क्षणिक प्रतिक्रिया होती. कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा नोंदवला गेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाविकांनीही गर्दी आणि पुढील परिस्थिती लक्षात घेता पंढरपूरच्या धर्तीवर देवस्थानने सुरू केलेल्या मुख दर्शनाचा लाभ घ्यायला हवा. जेणेकरून गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईलस असे पोलिसांना वाटते.
देवस्थानचे विश्वस्त मनोज थेटे यांनी सुरक्षा रक्षकांनी भाविकांना पुढील दोन तासात दर्शन होईल, असे सांगितले होते. मात्र भाविकांनी दरवाजा बंद ठेवल्याने देवस्थानच्या मुख्य दरवाजाला लाथा मारण्यास सुरूवात केली. सुरक्षारक्षकांनी समजावण्यास सुरूवात केली. परंतु, भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी शिवीगाळ करत दरवाजांवर बाटल्या फेकल्या, सुरक्षारक्षकाला मारहाण केली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरक्षारक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, देवस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल केल्यामुळे हा प्रकार घडला. काही भाविकांनी गैरवर्तन केले असल्यास देवस्थानने रितसर पोलिसात तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु, तसेही घडलेले नाही.