नाशिक : महावितरण कंपनीच्या रोहित्र दुरूस्ती आणि चाचणी कामामुळे विद्युत पुरवठा शनिवारी बंद ठेवण्यात येणार असल्याने मुकणे धरणातून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही.या बाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. शहरात पाणी पुरवठा वितरणात अनेक समस्या आहेत. अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. काही भागात सातत्याने पाणी पुरवठा होतो. या परिस्थितीत अन्य कारणास्तव पाणी पुरवठा बंद राहिल्यास टंचाईला सामोरे जावे लागल असल्याची सामान्यांची भावना आहे.
पाणी पुरवठ्याच्या विषयावरून विरोधकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मध्यंतरी आ. सीमा हिरे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत होणे आणि ‘व्हॉल्व्हमन’ पाणी सोडण्यासाठी भेदभाव करीत असल्याची बाब गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेला दिले होते. मागील काही महिन्यांत स्मार्ट मिटर बसवणे व जल वाहिनीच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पाणी पुरवठा बंद ठेवला गेला आहे. त्याची शनिवारी पुनरावृत्ती होत आहे.
महापालिकेच्या मुकणे धरणाच्या रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड उपकेंद्र गोंदे येथील एक्स्प्रेस फिडरवरून ३३ केव्ही वीजपुरवठा होतो. रेमण्ड उपकेंद्र येथे महावितरण कंपनीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत करण्यात येणाऱ्या कामानिमित्त वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुकणे येथून होणारा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहील.
परिणामी, शनिवारी शहरातील नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागात पाणी पुरवठा होणार नाही. काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येईल. यामध्ये नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. २४, २५, २६, २७, २८, २९, ३० या ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधील वडनेर गेट, पंपीगपर्यंत, रेंज रोड याठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच नाशिक पूर्वमधील प्रभाग क्रमांक १४, २३ आणि ३० या ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
