नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटात शुक्रवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर, २० जण जखमी झाले. घाटातील उताराच्या रस्त्यावर मालमोटारीचे ब्रेक निकामी झाल्याचा अंदाज आहे. या मालमोटारीने समोरील तीन वाहनांना उडवले.महामार्गावर चांदवड- मालेगाव दरम्यान राहुड घाट आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास घाटात हा अपघात झाल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. भरधाव मालमोटारीची धडक जबरदस्त होती की अन्य वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात उषा देवरे (४६ मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या वाहनांतील २० जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना चांदवडच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींना मालेगाव व इतरत्र खासगी रूग्णालयात नेण्यात आले.अपघातामुळे महामार्गावरील एका बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील उतारावर मालमोटारीचा ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त होत आहे. इको व स्विफ्ट मोटारीसह मालवाहू वाहनाचे मोठे नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींमध्ये अभिमन देवरे, जिजाबाई देवरे, मिराबाई पवार, शितल चव्हाण, सार्थक पाटील, बापू महाले, रोशनी माळी, सोनाली पाटील, रेणुका पाटील (६ महिने) यांच्यासह मालेगाव येथील १० जणांचा समावेश आहे. तर मुंबई येथील तनवीर अनिस शेख, आफरीन शेख, इनाया शेख (७), रुमेहा शेख (५) व अरवा शेख हे जखमी असल्याची माहिती चांदवड उपजिल्हा रूग्णालयाने दिली.