जळगाव – जिल्ह्यातील अनेक दिग्गज एका पाठोपाठ पक्ष सोडून गेल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस खिळखिळी झाली आहे. पक्षावर निष्ठा ठेवून असलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे गुरूवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तब्बल ११ महिन्यानंतर प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात येत असले, तरी मागील काही बैठकांमधील वादाचे प्रसंग लक्षात घेता आताच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला होता. तरी सुद्धा पक्षाचे अग्रगण्य नेते व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम केले. त्यामुळे पक्षाचे नेतृत्वही निश्चिंत होते. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे आणि कैलास पाटील यांनी शेकडो समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला. या घडामोडींमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यातून सावरण्यासाठी जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेण्यात आले.संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ज्येष्ठ नेत्यांचा मोठा गट फुटूनही पक्षाच्या ताकदीवर परिणाम झाला नसल्याचे दाखवून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पुन्हा उंचावण्यात आला.

प्रत्यक्षात, अनेक दिग्गज सोडून गेल्यानंतरही पक्षाशी निष्ठा जपणाऱ्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना शरद पवार गटात पूर्वीसारखा मान-सन्मान मिळेनासा झाल्याची चर्चा सुरू झाली. काही ठराविक पदाधिकारी मनमानीपणे निर्णय घेत असल्याचे आरोपही पुढे झाले. त्यामुळे वाढत्या नाराजीतून काही कार्यकर्ते व पदाधिकारी गट सोडून इतर पक्षांकडे वळल्याचे चित्र दिसून आले. याच दरम्यान पार पडलेल्या शरद पवार गटाच्या जिल्हा बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले. पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण आणि कोणी कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे लक्षात घेऊन रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांनीही मंगळवारी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये घरवापसी केली.

या पार्श्वभूमीवर, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जळगाव जिल्हा चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जळगावमध्ये आले होते. त्यानंतर पाटील यांनी जळगाव जिल्ह्याकडे फार लक्ष दिले नाही. तब्बल ११ महिन्याच्या कालखंडानंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले नवीन प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या दौऱ्याकडे पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या आशेने पाहत आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यात पक्षाच्या बैठकांमध्ये उद्भवलेले वादाचे प्रसंग पाहता प्रदेशाध्यक्षांसमोर त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आताही आहेत. प्रदेशाध्यक्ष शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटनेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.