नाशिक: नवरात्रोत्सव जिल्हा रुग्णालयाच्या वतीने अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात येतो. यंदाही जिल्हा रुग्णालयात दरवर्षीप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात जन्मलेल्या मुलीचा आणि तिच्या मातेचा सन्मान करण्यात आला.
नवरात्र उत्सवात स्त्रीशक्तीचा जागर कितीही होत असला तरी आजही समाजातील काही घटकांना ती नकोशी असते. आजही वेगवेगळ्या माध्यमातून तिचा जन्म नाकारला जातो. काही ठिकाणी ती जन्माला आल्यानंतर नकोशी म्हणून सोडून दिले जाते. यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने काही वर्षांपासून नवरात्रोत्सवात अष्टमीला मुलगी जन्माला आल्यास नवजात शिशुसह मातेचा सन्मान करण्यात येतो. यंदाही रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात या सोहळ्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. मंगेश थेटे आदींसह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अष्टमीच्या दिवशी जिल्हा रुग्णालयात पहिल्या मुलीस जन्म दिलेल्या माता प्रेरणा गवारे (रा. त्र्यंबकेश्वर) यांचे औक्षण अधिष्ठाता डॉ. पाटील यांनी केले. कक्षातील सर्वांना पेढे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे आणि डॉ. पाटील यांच्या हस्ते नवजात बालिकेस सुंदर फ्रॉक देण्यात आला. पीसीपीएनडीटी विधी समुदेशक सुवर्णा शेपाळ यांनी मातेची साडी देवून ओटी भरली. पाटील यांनी मुलीवर कविता सादर केली. सूत्रसंचालन डॉ. निलेश पाटील यांनी केले. या स्वागतामुळे भारावलेल्या गवारे यांना भावना आवरता आल्या नाहीत.
आठ ते नऊ वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने नवरात्र उत्सवात अष्टमीला मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात येते. याशिवाय समाजमाध्यमातून लेक लाडकी या फेसबुकच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत याविषयी वाहिनी सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रसिध्द कलाकारांकडून या विषयावर चित्रफितीही तयार करण्यात आल्या आहेत. – ॲड. सुवर्णा शेपाळ (विधी समूपदेशक)