नाशिक – जिल्ह्यातील सप्तशृंग गडावर देवीची महापूजा आणि घटस्थापना झाल्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. भाविकांनी बोल अंबे की जय, सप्तशृंगी माता की जय, असा जयघोष करत मंदिर परिसर दणाणून सोडला. उत्सवानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अन्य देवी मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे. सायंकाळी पंचवटीसह काही भागात संततधार सुरु झाल्याने गरबा, दांडियाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

सोमवारी पहाटे सप्तश्रृंग गडावर प्रारंभी विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांनी सपत्नीक देवीच्या अलंकारांचे पूजन केले. यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयापासून देवीच्या अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अलंकारांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यानंतर हे अलंकार मंदिरात नेण्यात आले. दरम्यान, पंचामृताने उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पहिल्या माळेला श्रीभगवतीस पांढऱ्या रंगाचे भरजरीचे पैठणी महावस्त्र नेसविण्यात आले. सांजशृंगारानंतर श्री भगवतीस अलंकार परिधान करण्यात आले. त्यात रत्नजडीत सोन्याचे मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, मयूरहार, गुलाबहार, कर्णफुले, नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपट्टा, चांदीचा मुकूट आदी अलंकारांचा समावेश आहे. पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली. न्या. जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे आदी उपस्थित होते.

श्री कालिका देवी यात्रोत्सव प्रारंभ

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. सोमवारी पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते अभिषेक तर, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सकाळ सत्रात ढोलताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या निनादात ध्वजवंदन करण्यात आले. महिला मंडळाचे भजन झाले. या प्रसंगी कालिका मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, किशोर कोठावळे आदी उपस्थित होते. यात्रोत्सवावर आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाचे सावट आहे. आदिवासी विकास भवनासमोर आंदोलकांनी ठिय्या दिलेला असल्याने मंदिर परिसरात येणारे भाविक तसेच यात्रेकरूंना अडचणी येत आहेत. भाविकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने गडकरी चौक ते हॉटेल संदीप पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आदिवासी विकास भवनासमोर आदिवासी संघटनांचे बिऱ्हाड आंदोलन अडीच महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे. पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी, बिऱ्हाड आंदोलक आंदोलनाच्या जागेवर राहण्यावर ठाम असल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे सांगितले.