जळगाव – जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीसह मका, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन, तूर या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. ही स्थिती लक्षात घेता मरणपंथाला आलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी तातडीने गिरणा धरणाचे एक आवर्तन सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यात ऑगस्ट महिना अर्धा संपला झाला तरी अद्याप कुठेच शेतांमधून पाणी वाहून निघालेले नाही. त्यात आता पावसाने गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारली आहे. अशा स्थितीत, फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बहुतेक सर्व पिकांची खूपच नाजूक अवस्था झाली आहे. दुपारच्या वेळी पिके ऊन धरू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आधीच पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके आता नाजूक स्थितीत पोहोचली आहेत.
या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्षा आशा पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, कंत्राटदार मोहीत पवार, शिरसोली येथील महेश बोरसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
पिकांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चारा व पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गिरणेचे एक आवर्त सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांची भेट घेत शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
आजपर्यंत कालवा समितीची बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच गिरणा धरणाचे पाणी सोडले जात असे. परंतु, यावेळी चाळीसगाव एमआयडीसीसाठी १५०० क्यूसेक पाणी सोडण्याचा प्रसंग इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. त्यात आणखी १५०० क्युसेकचा विसर्ग मिळविल्यास पाण्याचे एक आवर्तन सोडता येईल. ज्याचा लाभ धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होऊन पिकांना जीवनदान मिळेल. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाअभावी परिसरातील शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत.
धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर या तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी स्वरूपाचे आहे. अशा परिस्थितीत गिरणा धरणातून कालव्याने आवर्तन सोडल्यास असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. तातडीने कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.