जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे सोने आणि चांदी नवा रेकॉर्ड करताना दिसत आहेत. बुधवारी देखील दोन्ही धातुंच्या दराने मोठी उसळी घेत उच्चांकी घोडदौड कायम ठेवली. ग्राहकांसह व्यावसायिकांना त्यामुळे धक्का बसला.
भारतीय संस्कृतीत सण-उत्सव, विशेषतः दिवाळीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने हे समृद्धी, स्थैर्याचे प्रतीक देखील मानतात. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. २४ कॅरेट सोने हे सर्वाधिक शुद्ध आणि गुंतवणुकीसाठी उत्तम मानले जाते. परंतु, त्यापासून दागिने बनवले जात नाहीत. दागिने प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्यापासून तयार केले जातात, तर काही हलक्या व आधुनिक डिझाइन्ससाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर होतो. मात्र, या दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्याने अनेकांना दागिने खरेदी करणे अवघड होत चालले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीमागे रूपयाच्या कमजोरीचे मुख्य कारण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरल्याने आयात खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीत गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून दोन्ही धातूंना मोठी मागणी असून त्यामुळे त्यांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तरी सुद्धा तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीची मागणी आणि दरवाढ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरात सोमवारी ८२४ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २८ हजार ५४४ रूपयांचा उच्चांक केला होता. मंगळवारी आणखी २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ८१० रूपयांचा उच्चांक केला. बुधवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ४२८ रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले.
चांदीत ५१५० रूपयांनी वाढ
शहरात सोमवारी सुमारे १० हजार ३०० रुपयांची ऐतिहासिक वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ८५ हजार ४०० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. मंगळवारी आणखी २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीने एक लाख ८७ हजार ४६० रूपयांचा उच्चांक केला होता. बुधवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा तब्बल ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला.