जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळी जवळ येत असताना, सोन्याचे दर दररोज नवीन उच्चांक करताना दिसून येत आहेत. सोमवारी देखील दरवाढ नोंदवली गेल्याने सोन्याने पुन्हा नवा उच्चांक केला. ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली.
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असून, त्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. यामागे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेत संभाव्य सरकारी बंद पडण्याची भीती. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजेच सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, देशातील सणासुदीच्या काळात वाढलेली मागणीही किमती वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. परिणामी, शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली.
तज्ज्ञांच्या मते, धनत्रयोदशीपर्यंत सोन्याचा दर एक लाख ३० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. तर जागतिक बाजारात त्याची किंमत प्रति औंस ४,१५० ते ४,२५० डॉलर्स दरम्यान राहू शकते. तथापि, २०२६ च्या सुरुवातीला सोने प्रति १० ग्रॅम १.५० लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या गोंधळामुळे डॉलर कमकुवत झाला आहे. आणि गुंतवणूकदार सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी सोन्याकडे धाव घेत आहेत.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक बदलांमुळे आणि चलनविषयक धोरणांच्या अपेक्षांमुळे ही गती कायम आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या वाढत्या अपेक्षांमुळे ही वाढ झाली आहे. कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सोने परवडणारे झाले आहे. त्यामुळेही सोन्याची मागणी आणखी वाढली आहे. आणि सध्या सोन्याच्या किमती कमी होण्याची कोणतीही आशा नाही. धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत सोने अधिक महाग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगावात शुक्रवारी ११३३ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २६ हजार १७५ रूपयांपर्यंत खाली आले होते. दिवाळी जवळ येत असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे लक्षात घेऊन ग्राहकांसह व्यावसायिकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी शनिवारी परत १५४५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ७२० रूपयांचा नवीन उच्चांक केला होता. सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने शनिवारचा उच्चांक मोडीत काढून एक लाख २८ हजार ३३८ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.