धुळे :  मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील येथील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची अखेर सुटका झाली आहे.केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुधवारपासून नागपूर- सुरत महामार्गावरील धुळे ते फागणे या बाह्य वळणरस्त्याने एकेरी वाहतूक सुरू केली. यामुळे हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांसह अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 खान्देश औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष भरत अग्रवाल, उपाध्यक्ष नितीन देवरे, कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र जाखडी, डिसान ॲग्रोचे संचालक अजय अग्रवाल, ओम श्री इंडस्ट्रीजचे संचालक कैलास अग्रवाल, उद्योग आघाडीचे नितीन बंग, लघुउद्योग भारतीचे वर्धमान संघवी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांच्यासह अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, व्यापार्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेत वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी केली होती.

 मुंबईहून आग्राकडे जाणारी वाहने, सुरत बायपासकडून येणारी वाहने तसेच धुळे शहरासह उत्तर व पूर्व दिशेकडून येणार्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे या चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. यातून अनेकदा अपघात होतात. याच मार्गावरून अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, व्यापारी, कामगार तसेच नागरिकांचा सतत वावर असतो. मात्र, वारंवारच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच औद्योगिक वसाहतीत येणार्या तसेच नाशवंत मालाची वाहतूक करणार्या अवजड वाहनधारकांच्या वेळेचाही प्रचंड अपव्यय होतो. यात अनेकदा मोठे आर्थिक नुकसानही होत आहे. याचे परिणाम अनेक उद्योग-व्यवसायांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. 

आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय  मंत्री नितीन गडकरींकडे यासंदर्भात पाठपुरावा केला नागपूर-सुरत महामार्गावरील धुळे ते फागणे या बाह्य वळणरस्त्याने १५ ऑक्टोबरपर्यंत किमान एकेरी वाहतूक सुरू करावी. त्यासाठी बाह्य वळणरस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धुळे ते फागणे बाह्य वळणरस्त्याचे काम तातडीने पूर्ण करत एक दिवस आधीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत एकेरी वाहतूक सुरू केली. नागपूरच्या दिशेने सुरतकडे जाणार्या वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. उर्वरित बाह्य वळणरस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता पवार यांनी आमदार अग्रवाल यांना दिली.

धुळे-फागणे बाह्य वळणरस्त्याने एकेरी वाहतूक सुरू झाल्याने  मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळील चौकात सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तसेच अपघातांचा धोकाही कमी होणार आहे.