नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवरून स्थानिकांमध्ये कमालीचा रोष प्रगट होऊन त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. साधारणत: ३० किलोमीटरचा हा मार्ग देवळाली आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन विधानसभा मतदारसंघातून जातो.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरोज अहिरे आणि हिरामण खोसकर या आमदारांनी एनएमआरडीएची कारवाई चुकीची ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. या कारवाईमुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आठ ते दहा दिवसांपासून हा विषय गाजत असला तरी जिल्ह्यातील चारही मंत्री अलिप्त राहिले. यावरून साधू-महंत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांनी चारही मंत्र्यांंवर ताशेरे ओढले आहेत.
ऐन दिवाळीत एनएमआरडीएने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुगलच्या आधारे मोजणी करीत शेतकऱ्यांना बेकायदेशीर नोटीसा बजावत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. प्राधिकरणाच्या चुकीच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार होत आहे. या विरोधात स्थानिकांनी रास्ता रोको, साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला. देवळाली आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन्ही मतदारसंघाचे आमदार सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत.
आ. हिरामण खोसकर यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री, कुंभमेळामंत्री यांच्यापर्यंत दाद मागून सणोत्सवात कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. संबंधितांनी सूचना करूनही एनएमआरडीएने दाद दिली नसल्याची खंत खोसकर यांनी मध्यंतरी व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे हे चार मंत्री आहेत. परंतु, कोणी यावर भाष्य केलेले नाही.
एनएमआरडीए विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांनी पाठिंबा दर्शविला. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सागरानंद महाराज आश्रमात बैठक झाली. बाधित शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे, सुरेश गंगापूत्र, विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते. आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष स्वामी शंकरानंद महाराज यांनी कुंभमेळ्याच्या नावाने ५०० कुटुंब उद्ध्वस्त करू नका, असा इशारा दिला.
जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असून ते मूग गिळून का गप्प बसले. ते रस्त्यावर का येत नाहीत, असा प्रश्न शंकरानंद महाराज यांनी केला. आ. हिरामण खोसकर यांनी जिल्ह्यात आदिवासी समाजाचा एक, मराठा समाजाचे दोन, माळी समाजाचा एक असे एकूण चार मंत्री असल्याचे सांगितले. सर्व आपले लोक आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर लोक रस्त्यावर उतरले असताना मंत्र्यांना दयामाया आली नाही. साधू-महंतांना जेे कळते, ते या मंत्र्यांना कळत नाही. असा टोला हाणत त्यांनी स्थानिक मंत्र्यांवर रोष प्रगट केला. जिल्ह्यात चार मंत्री असताना एकही मंत्री फिरकला नाही. आणि कुणाचाही फोन आला नसल्याचे आमदार खोसकर यांनी नमूद केले.
