जळगाव – जिल्ह्यात अनेक कारणांनी वाळू ठेक्यांचा विषय बारगळला असताना, त्याचा गैरफायदा घेऊन वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात असली, तरी वाळू तस्करी बिनबोभाटपणे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत, जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील वाळू साठा चांगलाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
जिल्ह्यातील तापी, गिरणा तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने डंपर, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने थेट नदीपात्रात नेण्यास बंदी घातली होती.तरी सुद्धा वाळू तस्करीवर आळा बसला नाही. ही स्थिती पाहता स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे पाऊल उचलले होते; परंतु, त्यात नंतरच्या काळात सातत्य न राहिल्याने वाळू माफियांना पुन्हा वाव मिळाला. जळगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रातही अवैध वाळू उत्खनन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तस्कर रात्रंदिवस उपसा करत असल्याने नदीचे पात्र विद्रुप झाले आहे. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याने पर्यावरणासह पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेवरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून अधूनमधून कारवाया केल्या जात असल्या, तरी त्या केवळ औपचारिकतेपुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळे वाळू माफियांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगाव शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या वाळू वाहतूक सुरू असून, ठिकठिकाणी वाळुचे अवैध साठे करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक व कार्यकारी अभियंत्यांची कार्यालये आहेत. त्याच ठिकाणी सध्या वाळू आणि खडीचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल विचारणा केल्यावर अभियंत्यांनी एका खासगी कंत्राटदाराला रस्त्याचे काम दिले आहे. आणि त्याने त्यासाठीच वाळू व खडी आणून टाकल्याचे सांगितले. सदरची वाळू नेमकी कोणत्या घाटावरून आणली, त्याचे उत्तर मात्र अधिकारी देऊ शकले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्यांनीच वाळू तसेच खडी आणून ठेवली आहे. – योगेश अहिरे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग).
तालुक्यात सध्या कुठेच वाळुचा ठेका सुरू नाही. त्यामुळे जळगाव शहरात कुठे वाळू साठा आढळून येत असल्यास त्याचा तातडीने पंचनामा केला जाईल. – शीतल राजपूत (तहसीलदार, जळगाव).