नाशिक :साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. वाहन, गृह तसेच सोने खरेदीमुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले.यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात ३० हजारांहून अधिक रुपयांची वाढ असल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारातील व्यवहारांवर झाला. अक्षय्यतृतीयेनिमित्त खास सोने खरेदीसाठी बाहेर पडणारा ग्राहकवर्ग फारसा दिसला नाही. लग्नसराईमुळे सोने खरेदी करणे आवश्यक असणाऱ्यांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला. पेशवाई, पारंपरिक, दाक्षिणात्य यासह विविध शैलीतील दागिन्यांना पसंती मिळाली.
त्यातही कमी वजनाच्या दागिन्यांना मागणी राहिली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींपासून वाहन, अन्य काही सामान, वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या. काही दुकानदारांकडून सोडत काढून पैठणी देण्यात आल्या. याविषयी राजापूरकर ज्वेलर्सचे चेतन राजापूरकर यांनी माहिती दिली. मागील वर्षी सोने खरेदी केलेल्यांना ४२ टक्के दरवाढीने चांगला परतावा मिळाला. काहींनी एक महिना आधीच नोंद केली होती. त्यांना वाढत्या दराचा फारसा परिणाम जाणवला नाही. सोन्याचे दर रुपये ९५,५०० अधिक जीएसटीसह ९७,८०० रुपये प्रतीतोळा असे राहिले. चांदीचे दर ९९ हजार रुपये प्रतीकिलो असे होते.
अक्षय्य तृतीयेनिमित्त गृह आणि वाहन बाजारात उलाढाल संमिश्र राहिली. महागडे सोने खरेदी करण्याऐवजी अनेकांचा कल गृह खरेदीकडे राहिला. सदनिका, कार्यालय यासह व्यावसायिक मालमत्तांसाठी नोंद करण्यात आली. शहरातील गंगापूर रोड, इंदिरानगर, पाथर्डी फाटासह पंचवटी या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशा तयार सदनिकांना अधिक मागणी राहिली. काहींनी घराचा ताबा घेतला. काहींनी घरासाठी आगाऊ नोंदणी केल्याचे बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर यांनी सांगितले.
वाहन बाजारातही उत्साहाचे वातावरण होते. नवीन वाहन धोरणाचा बाजारावर कुठलाही परिणाम झालेला नाही. चारचाकी वाहन खरेदीला प्रतिसाद राहिला. शहर तसेच ग्रामीण भागातून लोकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली. तुलनेत शेती पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीशी संबंधित टॅक्टर, मालवाहू वाहनांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे महिंद्रा शोरूमचे शिव पांडे यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या तुलनेत दुचाकींसह चारचाकी वाहनांनाही अधिक मागणी राहिली. कर्जाची सहज उपलब्धता, अत्यल्प रक्कम देवून वाहन ताब्यात मिळणे, यामुळे वाहन खरेदी वाढली. ई बाईकलाही अनेकांनी पसंती दिली. याशिवाय गृहोपयोगी आवश्यक टीव्ही, फ्रीज, कुलर, वातानुकूलीन वस्तूंसह इतर लहान-मोठ्या वस्तुंची खरेदी दिवसभर सुरू होती. भ्रमणध्वनी बाजारपेठेतही स्मार्टफोनची चलती कायम राहिली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या सवलतींचा पाऊस पाडण्यात आला.
आंब्यांना मागणी
शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी आंबा बाजारपेठेतही चांगलीच उलाढाल झाली. हापूस ७०० ते ९०० रुपये डझन तर, केशर १८० ते २०० रुपये किलो, लालबाग १५० ते १७०, बदाम १०० ते १५० आणि पायरी २०० ते २५० रुपये किलो असे आंब्यांचे दर राहिले. रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली इतर ठिकाणचे आंबे देण्याचे प्रकारही घडले.