नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या दर्जेदार, आकर्षक वस्तू नागरिकांसाठी विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळी मेळावा प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले. कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावरील प्रगती विक्री केंद्रात या वस्तू नागरिकांना उपलब्ध आहेत.

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून, कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी मेळाव्याची संकल्पना राबवली जात आहे. मेळावा उदघाटनावेळी कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगूटराव, उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ अधिकारी अशोक मलबाड, कारखाना व्यवस्थापक आदी उपस्थित होते. कैद्यांनी निर्मिेलेल्या कलाकुसरीच्या वस्तू पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे तसेच कारागृह प्रशासनाचे कौतुक केले.

हेही वाचा… शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर फसवणुकीचे गुन्हे; भुसे समर्थकांचे हिरे कुटुंबावर टिकास्त्र

या कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, रसायने, मूर्तीकाम, बेकरी, पैठणी, चर्मोद्योग आदी नऊ कारखाने असून येथे कैदी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू मेळाव्यात उपलब्ध आहेत. कैद्यांना रोजगार मिळून त्यांची दिवाळी गोड व्हावी, कारागृहाच्या महसुलात वाढ व्हावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कैद्यांना त्यांच्या कौशल्यानुसार प्रतिदिन ५५ ते ७० रुपये पगार मिळतो. त्यातून ते आवश्यक वस्तू कारागृहातून खरेदी करू शकतात. नातेवाईक कैद्यांना दरमहा आठ हजारापर्यंत मनीऑर्डर करू शकतात. कैद्यांनी तयार केलेले आकाशकंदील, साबण, पणत्या, उटणे, फिनेल, टेबल खुर्च्या, खादीचे कपडे, पर्स, देव्हारे, शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कैदी उत्कृष्ट पैठणी तयार करतात. त्यांना दिवाळीत मोठी मागणी आहे.

हेही वाचा… दिवाळीत कांदा लिलाव बंदची शेतकरी, ग्राहकांनाही झळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटीशांनी १९२७ साली बांधलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तीन हजार कैदी आहेत. दिवाळीत कैद्यांना श्रीखंड, पुरी, शिरा असे पक्वान्न दिले जाते. कारागृहातील खाद्यगृहातून खमंग चकली, चिवडा, अनारसे, मोतीचूर व बेसन लाडू, बाकरवाडी आदी फराळ अल्पदरात कैद्यांना मिळतो. कारागृहात देशी-परदेशी तसेच विविध जाती धर्माचे कैदी आहेत. तर ७० महिला कैदी आहेत. त्यांच्या मुलांना काराग़ृह प्रशासन कपडे, खेळणी, फुलबाजे देऊन दिवाळी गोड करते.