नाशिक : कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादकांनी एकिकडे मंत्री, लोकप्रतिनिधींना फोन करो आंदोलनातून भंडावून सोडले असताना देवळा तालुक्यात ढोल वाजवून नागरिकांना मोफत कांदा वाटप करुन सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला.

गुरुवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी ११७५ रुपये दर मिळाले. महिनाभरात दरात ५०० रुपयांनी घसरण झाली. अनेक राज्यात स्थानिक कांदा बाजारात आल्याने नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत मागणी घटली आहे. त्यातच बांगलादेशला अपेक्षित निर्यात होऊ शकली नाही. त्यातील अडथळे कायम असताना श्रीलंकेने आयात शुल्कात वाढ केल्याचा निर्यातीवर परिणाम झाला. याच सुमारास नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाने (एनसीसीएफ) दर स्थिरीकरण योजनेत खरेदी केलेला कांदाही दिल्लीमध्ये कमी दरात विक्रीला आणला आहे. सद्यस्थितीत कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने फोन करो आंदोलन केले. या माध्यमातून शेतकऱ्यांनी मंत्री आणि लोकप्रतिनिधींना फोन करून जाब विचारला.

याच दरम्यान मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली होती. कांदा दर, आयात-निर्यात धोरण, लागवड कालावधी या विषयी चर्चा झाली. शेतकऱ्यांना योग्य दर कसे देता येतील, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यावर चर्चा करण्यात आली. बैठकीस पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परंतु, कांदा दरात सुधारणा झालेली नाही.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे मोरया प्रतिष्ठान आणि शेतकऱ्यांनी ढोल वाजवून मोफत कांदा वाटपाचा उपक्रम राबविला. केंद्र सरकारचे निर्यातीबाबतचे धोरण धरसोडीचे राहिल्याने दर घसरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मातीमोल किंमतीत कांदा विकावा लागत असून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच कंदिल चौकात कांद्याचे ट्रॅक्टर आणून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गोणी भरून मोफत कांदा वाटप केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. यावेळी मोरया प्रतिष्ठानचे उमेश आहेर. चेतन आहेर. भूषण आहेर. विकी ठुबे. उज्वल भामरे आदी उपस्थित होते.