नाशिक – किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी गाठल्याने ग्राहकांना तो खरेदी करताना हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात होणारी नव्या लाल कांद्याची आवक लक्षणीय घटली. याचा परिणाम घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ ते ६० रुपये प्रति किलोवर गेला आहे. सद्यस्थितीत उत्पादन खर्च भरून निघाला तरी बरं, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भावना आहे.    

एरवी उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याची वेळ (सप्टेंबर, ऑक्टोबर) आणि नवीन लाल कांदा बाजारात (नोव्हेंबर) येण्याची वेळ यामधील काळात कांद्याचे दर वधारतात, असा अनुभव आहे. या वर्षी परतीच्या पावसाने कांद्याचे चक्र बिघडले. ऑक्टोबर महिन्यात चांदवड, देवळा, पेठ, सिन्नर, नाशिक व निफाड भागास परतीच्या पावसाने झोडपले होते. सुमारे १३ हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. ज्यांनी आधी लागवड केली होती, त्यांचा कांदा आता काढणीवर येणार होता. शेतात पाणी साचल्याने तो खराब झाला. सिन्नरमध्ये एका शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. एरवी, नोव्हेंबरपासून लाल कांद्याची आवक वाढू लागते. परंतु, या परिस्थितीमुळे चालू महिन्यात आवक जेमतेम राहील. डिसेंबरपासून कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप

शहरी भागात कांदा १०० रुपयांवर गेल्यामुळे गृहिणींनी खरेदी करताना विचार करावा लागतो. लहान आकाराचे कांदे  ७० रुपयांना आहेत. सध्या घरात कांद्याचा जपून वापर होत आहे. आधी पाच, सहा किलो कांदा खरेदी केला जायचा. आता तो एक, दोन किलोच खरेदी करावा लागतो. कांद्यासह भाजीपाल्याची ही स्थिती असल्याचे गृहिणी गायत्री पारख यांनी सांगितले. नाशिकमधील मिसळ या आवडत्या खाद्य पदार्थातून कांदा जवळपास अंतर्धान पावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तरच उत्पादन खर्च मिळणे शक्य

चांदवड तालुक्यातील ऊसवाड येथील बाळू आहेर यांनी दीड एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. नोव्हेंबरमध्ये ते काढणीवर आले असते. तत्पुर्वीच पावसात रोपे वाकडेतिकडे होऊन गेले. साधारण परिस्थितीत ५० ते ६० क्विंटलचे उत्पादन झाले असते. आता १० ते २० क्विंटल कांदे निघाले आणि दर असेच राहिले तरच लागवडीसाठी केलेला ४० हजार रुपयांचा खर्च भरून निघू शकेल, असे ते सांगतात. पावसाने केवळ पिकाचे नुकसान झाले नाही तर, उन्हाळ कांद्याची रोपे खराब केली. ६४२ हेक्टरवरील कांदा रोपवाटीकेचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करून रोपे तयारी करावी लागतील. पुढील उन्हाळ कांद्याच्या लागवडीला उशीर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.