मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळाची परंपरा कायम

परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्यालयात जाऊन गाऱ्हाणे मांडले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला पदवी शाखेच्या लोकसेवा अभ्यासक्रमाच्या पहिल्याच पेपरला बहुतांश प्रश्न पुस्तकाबाहेरील आल्याने विद्यार्थ्यांनी तो सोडविण्यास नकार दिला. या संदर्भात दीड तास गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो कसाबसा लिहिणे भाग पडले. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्यालयात जाऊन गाऱ्हाणे मांडले. यानिमित्ताने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्याचे चाणक्य मंडळ आणि मुक्त विद्यापीठ यांच्यातर्फे बीए लोकसेवा हा अभ्यासक्रम संयुक्तपणे आखण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बुधवारी भोसला सैनिकी महाविद्यालयात सुरुवात झाली. ‘मुक्त विद्यापीठ शिक्षण’ या विषयावर पहिला पेपर होता. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या पुस्तकातील एकही प्रश्न नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यास नकार दिला. या संदर्भात परीक्षा केंद्राने विद्यापीठाशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. तथापि, जवळपास दीड तास कालापव्यय केला गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. या वेळी आधी नवीन प्रश्नपत्रिका दिली जाईल, असे सांगितले गेले. नंतर अचानक उपरोक्त विषयाचा पेपर योग्य असल्याचा निर्वाळा देऊन तासाभरात तो पूर्ण करण्यास सांगण्यात आले. परीक्षार्थीसमोर कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी तो कसाबसा सोडविण्याचा प्रयत्न केला. पेपर झाल्यानंतर १० ते १२ विद्यार्थ्यांनी थेट मुक्त विद्यापीठात कुलगुरूंची भेट घेतली. मूल्यमापन आणि परीक्षा विभागाने या प्रश्नपत्रिकेत काही गोंधळ झाल्याचे मान्य केल्याचे तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. या संदर्भात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Open university examination confusion