करोनामुळे जिल्ह्य़ात प्रतिसाद नाही

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : करोना आणि त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी यामुळे अर्थचक्राचा गाढा रुतलेला असताना याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. अवयवदान चळवळही यातून सुटलेली नाही. जिल्ह्य़ात तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून अवयवदान, देहदान झालेले नाही.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्यास सुरुवात झाली. हा संसर्ग पाहता खासगी रुग्णालये, दवाखाने बंद झाले. सर्व भार सरकारी रुग्णालयांवर आला. दुसरीकडे, वेळेत उपचार न मिळाल्याने अल्पशा आजाराने, दीर्घ आजारामुळे काहींचे निधन झाले. या काळात रुग्णालयात मृ्त्यू झाल्यावर कोणत्याही मयत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून अवयवदानाविषयी विचारणा झाली नाही. करोनाविषयी असणाऱ्या भीतीमुळे डॉक्टरांनी याविषयी नातेवाईकांना सल्ला दिला नाही. परिणामी ही चळवळ थंडावली. दुसरीकडे, करोना काळात आरोग्यविषयक योजनांमध्ये बदल झाले. पहिले दोन महिने टाळेबंदीमुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णत बंद होती. अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी आजाराविषयी असणाऱ्या भीतीचे सावट या चळवळीवर राहिले. त्यातही मृत व्यक्ती करोना संशयित, करोनाबाधित आहे का आणि ज्याला अवयव दान करायचे त्याची स्थिती काय, याविषयी संभ्रम कायम असल्याने अवयवदानाकडे फारसे कोणी फिरकले नाही. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या अवयवदानाशी संबंधित केंद्रातून कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती झेडटीसीसी पुण्याचे अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी दिली.

मागील वर्षी ६३ व्यक्तींनी या चळवळीत सहभाग घेतला. यंदा टाळेबंदी लागू होण्यापूर्वी १४ लोक या चळवळीत सहभागी झाले होते.  टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मुंबईत  तीन आणि पुण्यात चार जणांचे अवयवदान झाले.

नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये अद्याप ही प्रक्रिया थंडावली आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. करोनाग्रस्त, करोना संशयित अहवाल वेळेत येत नाही. त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा पाहता कोणी कोविड चाचणी करण्यास उत्सुक नाही. याचा फटका चळवळीला बसत असल्याचे डॉ. रकिबे यांनी नमूद केले.