नाशिक : आम्ही झोपलो होतो..काय झालं काहीच माहिती नाही..गाडीला जोरात हादरा बसला आणि अचानक गाडीने पेट घेतला. आम्ही मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो.. औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला. अपघात घडला, त्यावेळी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याविषयी अनिश्चितता आहे. अपघातातून वाचलेल्या पूजा गायकवाड यांचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. वाशिम जिल्हातील पूजा या त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आर्यन आणि दोन वर्षांचा मुलगा मयंक, भाऊ गणेश लांडगे यांच्याबरोबर प्रवास करत होते. नाशिक जवळ येताच बसमधील काही प्रवासी काही ठिकाणी उतरले होते. अचानक बस कशाला तरी धडकली, हे त्यांना समजले. हादरा बसताच सर्व खडबडून जागे झाले. काही कळण्याच्या आत बसला आग लागली. बसच्या पुढील दिशेला लागलेली आग पाहताच गणेशने मुलांना खिडकीतून बाहेर फेकले. मलाही बाहेर फेकले. त्यामुळे पोटाला मार बसला. त्यानेही उडी मारली. आजूबाजूचे लोक मदतीला धावले. परंतु, क्षणार्धात बस आगीच्या लोटात सापडली, असे पूजा यांनी सांगितले.
नागपूरहून काही कामासाठी अमित यादव पंचवटीत आले होते. नाशिक काही अंतरावर असताना बस थांबल्यावर ते पुढील प्रवासासाठी बसमध्ये बसले. काही अंतर जाताच बसला हादरा बसला. प्रवासी पुढील दरवाज्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. पण आग लागताच एकच धावपळ उडाली. पुढे जाण्यापेक्षा अमित यांनी मागील खिडकीची काच लाथ मारून फोडली. त्यातून ते बाहेर पडले. यामध्ये कान कापला गेला, हाताला खरचटले आणि पायही सुजला आहे. यवतमाळ येथील आरती जाधव यांनीही अनुभव मांडला. अपघात होण्याच्या काही क्षण आधी नाशिक, नाशिक असे कोणीतरी ओरडत होते. अर्धवट झोपेत आरती आणि त्यांचे पती सचिन जाधव असतानाच बस कशावर तरी आदळल्याचे त्यांना जाणवले. बस पेटण्यास सुरुवात होताच सचिन यांनी खिडकीची काच फोडली. आरतीला आधी बाहेर ढकलून दिले. नंतर तेही बाहेर आले. दोघांना किरकोळ दुखापत आहे. सचिन यांच्या पायाला मार लागला आहे.
बसमध्ये क्षमतेहून दुप्पट प्रवासी : अपघातग्रस्त खासगी बसची ३० प्रवासी इतकी क्षमता होती. परंतु, यवतमाळ-मुंबईचा प्रवास ५५ जण करीत होते. क्षमतेहून जवळपास दुप्पट प्रवासी घेऊन ही बस प्रवास करीत असल्याचे उघड झाले.