नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत नाशिकमध्ये प्रशासनाची स्नान घाटांची लांबी वाढविण्याची योजना असून त्यासह सीसीटीव्ही, साधुग्राम विस्तार या विषयांवर साप्ताहिक बैठकीत चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने साप्ताहिक बैठका घेण्यात येत आहेत.  बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी, कुंभमेळा तयारीला गती देण्यात आली असून स्नान घाटांची लांबी वाढवण्याची योजना असल्याचे सांगितले. घाटांची लांबी वाढविणे हे काहीसे आव्हानात्मक ठरू शकते. यासाठी जागेचा प्रश्न महत्वाचा आहे. घाटांचा विस्तार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जागा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. प्रशासन या कामासाठी सकारात्मकपणे विचार करत आहे.

साधुग्राम क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे. मागील कुंभमेळ्यात साधुग्रामचे क्षेत्र ३२५ एकर होते. आता ते ४०० एकरपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामचा विस्तार १७ एकरवरून ३० एकरपर्यंत करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर अहवाल तयार करुन वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार असल्याचे गेडाम यांनी नमूद केले.

कुंभमेळ्याचे आयोजन धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यासाठी प्रशासन विविध उपाययोजना आखत आहे. यावेळी साधुग्राममध्ये अधिकाधिक साधू-संतांना सुविधा मिळवून देण्यासाठी व्यवस्थापन चांगले हाताळता यावे, याकरिता साधुग्रामचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येईल. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्याबाबत आम्ही प्राधान्य देणार आहोत, असेही गेडाम यांनी नमूद केले. कुंभमेळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता गर्दी नियंत्रण, वाहतूक नियंत्रणासाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात सध्या १३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. ३१ मार्च पर्यंत हे सर्व कॅमेरे कार्यान्वित होतील, असे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात आले असले तरी याव्यतिरिक्त काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक असल्याची सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे. त्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभमेळ्याच्या ८० लाख भाविक येण्याची शक्यता

कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला सुमारे ८० लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. यापैकी ३० लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे. पर्वणीच्या आठवडाभर आधी आणि नंतर अशा दोन्ही वेळी गर्दीचा अंदाज लक्षात घेता वाहतूक नियोजन करावे लागणार आहे. याचा आराखडा आम्ही तयार करत आहोत. काही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यावर विचार करण्यात येत असल्याचे गेडाम यांनी सांगितले.