जळगाव – जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर भाजपसह अजित पवार गटाने पक्षाचे मेळावे घेऊन अनेक दिग्गजांचे प्रवेश घडवून आणले आहेत. त्यानंतर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मेळावा घेण्याचे नियोजन केले होते. परंतु, शिंदे यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली असून, त्यासाठी प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पंचायत समित्यांचे सभापती तसेच नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यात महापौरांचे आरक्षण निघेल. निवडणुकांची लगीनघाई सुरू झाल्याचे लक्षात घेता राजकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुका स्वतंत्रपणे लढविणाऱ्या महायुतीतील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट, या तिन्ही पक्षांकडून यंदा युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले जात आहेत. मात्र, आतल्या गोटात वेगळे चित्र असून, पक्ष नेते आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे गुप्त निर्देश देताना दिसत आहेत.

विशेषतः भाजप स्वबळाच्या तयारीत सर्वात आघाडीवर असल्याचे जाणवते. मंत्री गिरीश महाजन यांनी तर समोरचा कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये सामावून घ्या, अशी भूमिका घेतल्याने शिंदे गटासह अजित पवार गटाची अस्वस्थता आणखी जास्त वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप इतक्या नाही पण किमान निम्म्या जागांवर विजय मिळविण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अजित पवार गटासोबतच शिंदे गटाचीही हालचाल अलीकडे वेगाने वाढली आहे. शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच युती कायम ठेवावी, असे आवाहन केले आहे. युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील, अशीही उघड भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १० तारखेला जळगावमध्ये आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. जिल्ह्यातील काही माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित झालाच नाही. याआधीही ते पाच ऑक्टोबरला जळगावात येत असल्याचे सांगितले जात होते. दोन्ही वेळा दौरा रद्द झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा दिवाळीनंतर शिंदे जळगावला येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी त्यांच्या संभाव्य दौऱ्याविषयी अजुनही साशंकच आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर १० तारखेला येणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला. आता बहुतेक ते दिवाळीनंतरच येतील. –विष्णू भंगाळे (जिल्हाप्रमुख- शिवसेना एकनाथ शिंदे गट, जळगाव)