नाशिक: दिवाळी म्हणजे मामाचे गाव…भटकंती. यंदा मात्र दिवाळीच्या सुट्टीतील प्रवास महागला असून नियमित भाड्यात १० टक्के वाढ झाली आहे. प्रवाशांची या काळात प्रवासासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्ह्यात ६०० हून अधिक बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक तालुक्यासह औरंगाबाद, मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> जळगाव: गाळेभाडे थकबाकीवरील दंड २५ ऐवजी दोन टक्के आकारणार; गाळेधारक संघटना शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दिवाळीच्या सुटीत लहान मुलांना मामाच्या गावाला जाण्याचे तर, महिलांना भाऊबीजसाठी माहेरी जाण्याचे वेध लागतात. अनेक कुटूंब दिवाळीची सुट्टी पर्यटन स्थळी घालविण्याचे नियोजन करतात. दिवाळीतच मुलांना सुट्टी मिळत असल्याने अनेक पालक या दिवसांमध्येच बाहेर फिरायला जाण्याची योजना आखतात. त्यासाठी आर्थिक नियोजन वर्षाच्या सुरुवातीपासूनच केले जाते. अनेक जण धार्मिक पर्यटनाला महत्व देत असले तरी मुलांसह फिरायला जाणाऱ्यांकडून प्रामुख्याने समुद्र किनारा असलेली ठिकाणे तसेच कोकण, मुंबई, औरंगाबाद यासह अन्य ठिकाणी भटकंती करण्यास प्राधान्य दिले जाते. यासाठी काही वेळा खासगी वाहतुक व्यवस्थेचा आधार घेतला जातो. खासगी वाहतूक नियोजनात बसविणे परवडत नसणाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला पसंती दिली जाते. त्यामुळेच या दिवसात होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाही महामंडळाने जिल्ह्यात ६२५ जादा बससेवेचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, येवला, निफाड, चांदवड, सटाणा, बागलाण, देवळा यासह अन्य तालुक्यांमध्ये जादा बससेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय नाशिक- धुळे, जळगाव, नंदुरबार, साक्री, नवापूर आदी ठिकाणी बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबादसह प्रवाश्यांच्या मागणीनुसार अन्य ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> … अन्यथा नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल बंद ,खड्ड्यांची पाहणी केल्यावर छगन भुजबळ यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनामुळे मागील दोन वर्षापासून सारं काही थांबले होते. यंदा करोनाचे निर्बंध नसल्याने दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त साधत बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इंधन दरवाढीमुळे प्रवास महागला आहे. एरवी दिवाळीच्या सुट्टीत दक्षिण भारतातील केरळ, राजस्थान, अंदमानला पसंती असते. मात्र हवाई प्रवास महागला. त्यातच रेल्वेसेवाही नियमीत सुरू नसल्याने प्रवाश्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे राज्य आणि जवळच्या भागांना पसंती मिळत आहे. यातही नेहमीच्या पर्यटन स्थळांपेक्षा नवीन ठिकाणे (उदा. चिखलदरा, मेळघाट, शिरोडा, कोंडुरा) आदी परिसर शोधला जात आहे. याशिवाय बाहेरील राज्यातून नाशिक, इगतपुरीला मागणी असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक दत्ता भालेराव यांनी दिली.