मालेगाव : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक शहरात गुंडांविरोधात उघडलेल्या मोहिमेचे अनुकरण आता ग्रामीण भागातही पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणण्यास सुरुवात झाली असून सामान्य जनतेत पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे. रस्त्यांवर तलवारी नाचवत आणि रिल्स बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड टोळक्यास मालेगाव पोलिसांनी असाच दणका दिला आहे.
गेली काही दिवस नाशिक शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली. त्यातच गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या काही व्यक्ती चक्क सत्ताधारी पक्षांच्या वळचणीला जात असल्याने आणि गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याचे चित्र निर्माण झाल्याने या गुन्हेगारांना कुणाचे अभय मिळत आहे, असा प्रश्न सामान्यजणांना पडत होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पाठबळ लाभलेल्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली. इतकेच नव्हे तर पकडलेल्या गुंडांची पोलिसांकडून धिंड काढली जात आहे. तसेच ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी भाषा गुंडांच्या तोंडून जाहीररित्या वदवून घेतली जात आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या या कारवाईचे जिल्हाभर कौतुक होत आहे. ग्रामीण पोलिसांनीही आता गुंडांविरोधात असाच आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. मालेगाव शहरातील पूर्व भागात रात्रीच्या सुमारास हातात तलवार घेत पाच दुचाकींवरून गल्लीबोळांतून सुसाट वेगाने निघालेल्या १५ जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. तलवारी नाचविण्याचे रिल्स बनवत लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. येथील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांना ही बातमी समजल्यावर मालेगाव पोलीस ‘ॲक्शन मोडवर’ आले. त्यांनी तातडीने शोध मोहीम राबवून या टोळक्यातील १२ जणांना लागलीच ताब्यात घेतले. पकडल्यानंतर या टोळक्याची शहरात पोलिसांनी धिंड काढली. या टोळक्यातील अन्य तीन संशयीत फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुंडांचे हे टोळके दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असेही पोलीस तपासात नंतर निष्पन्न झाले.
मालेगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांतून मद्य घेऊन मोकळ्या जागेत किंवा चहा-फराळाच्या टपऱ्यांच्या आडोशाला मद्यपी मद्य प्राशन करीत असतात. त्याचा लोकांना विशेषतः महिला वर्गाला खूप उपद्रव होत असतो. डिके चौक भागात असणारे दोन दारू दुकाने आणि तेथील मोकळी जागा यामुळे सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी तळीरामांच्या उघड्यावरील बैठकांमुळे तर तेथील जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे. यासंदर्भात गेली अनेक दिवस परिसरातील नागरिक ओरड करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा मद्यपींविरोधात कॅम्प व छावणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री धडक कारवाई केली. यात २० तळीरामांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान,अल्पवयीन मुले किंवा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करू नये, असा सज्जड पोलिसांनी या निमित्ताने दुकानदारांना भरला आहे.