जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना, निर्ढावलेली शासकीय यंत्रणा कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. तशात आता एरंडोल पोलिसाला तीन हजाराची लाच स्वीकारताना रंगहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वी केली.
बापू लोटन पाटील, असे तीन हजाराची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बापू पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. आणि ते नुकतेच जळगावहून एरंडोलला बदलून आले होते. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी हवालदार पाटील यांनी म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.
वास्तविक तक्रारदार स्वतः अपघातात गंभीर जखमी झाले होते. तडजोडीअंती तीन हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर हवालदार बापू पाटील यांनी तक्रारदाराला महामार्गावरील एरंडोल चौफुलीवर पैसे देण्यासाठी भ्रमणध्वनीवरून येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पाटील यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताच धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुरूवारी रात्री उशिपर्यंत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्याला चार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दिलीप दत्तात्रय पाटील, असे लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. पाटील हे अमळनेर येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार खासगी कंत्राटदार असून, त्यांनी चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणे येथील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे सुमारे तीन लाख ५५ हजार रूपयांचे काम घेतले होते. दरम्यान, तक्रारदार हे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या अमळनेर कार्यालयात गेले असता, त्यांची उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांच्याशी भेट झाली. तेव्हा पाटील यांनी तक्रारदार कंत्राटदाराला पूर्ण केलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाचा तीन लाख ५५ हजार रूपयांचा अहवाल बनवून दिल्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या दोन टक्के म्हणजेच सात हजार रूपयांची मागणी केली होती.
याशिवाय, गेल्याच आठवड्यात रिंगणगाव (ता. एरंडोल) येथे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याला जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराकडून ८० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. कंत्राटदाराला याआधी एक कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रूपये मिळाले होते. त्यानुसार, त्यांनी जलजीवन मिशनच्या मंजूर आराखड्याप्रमाणे १८ मार्च २०२४ पर्यंत कामही पूर्ण केले. त्यानंतर कंत्राटदाराने २३ लाखांचे उर्वरित देयक मिळावे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेकडे प्रकरण पाठविले. परंतु, जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा करारनामा अपूर्ण असल्याचे त्यांचे देयक प्रलंबित ठेवण्यात आले. कंत्राटदाराने रिंगणगावच्या सरपंचाशी संपर्क साधून हस्तांतर करारनामा देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याने त्यांच्याकडे सुमारे एक लाख रूपयांची लाच मागितली होती.