मालेगाव : सहा ठार आणि शंभरावर व्यक्ती जखमी झालेल्या मालेगावातील २९ सप्टेंबर २००८ च्या बॉम्बस्फोट घटनेची प्रतिक्रिया म्हणून त्यावेळी मोठा उद्रेक बघावयास मिळाला होता. ज्या दुचाकीच्या माध्यमातून स्फोटके पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला होता, तिच्याविषयी आधीच अवगत केले गेले होते. परंतु घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी बेपर्वाई दाखवली आणि त्यामुळे बॉम्बस्फोटाची घटना रोखणे शक्य झाले नाही, असा रोष लोकांमध्ये निर्माण झाला. त्यातूनच संतप्त जमावाने लक्ष्य केल्याने दोन डझनभर पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. वस्तुतः लोकांमधील पोलिसांबद्दलचा रोष केवळ गैरसमजावर आधारित होता आणि खरी वस्तुस्थिती वेगळीच असल्याची माहिती नंतर स्पष्ट झाली होती.
रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भिकू चौक भागात बॉम्बस्फोटाची ही घटना घडली होती. या खटल्यातील सर्व सात संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या घटनेच्या रात्री मालेगावात अत्यंत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती. स्फोटात काही लोक ठार तर, काही जखमी झाल्याची माहिती जसजशी पुढे येऊ लागली, तसतशी घटनास्थळावरील लोकांची गर्दी वाढू लागली होती. घटनेच्या बरोबर दोन वर्षे आधी शहरातील बडा कब्रस्तान व मुशावरात चौकात साखळी बॉम्बस्फोटांची घटना घडली होती. त्यात ३१ जण ठार आणि ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेच्या जखमा ताज्या असतानाच शहरात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोटाची घटना घडल्याने जमाव संतप्त झाला होता. शहरात वेगवेगळ्या अफवांचे देखील पीक आले होते.
घटनास्थळी उभ्या करून ठेवलेल्या एका दुचाकीच्या सहाय्याने स्फोटके पेरुन हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती एव्हाना पुढे आली होती. संशयास्पद दुचाकी या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून उभी होती. त्या संदर्भात तेथून जेमतेम १५-२० मीटर अंतरावर असलेल्या चौकीतील पोलिसांना पूर्वकल्पना देखील दिली गेली होती. परंतु पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्यांच्या बेपर्वाईमुळेच बॉम्बस्फोटाची घटना टाळता येऊ शकली नाही, असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे जमावाच्या संतापात आणखी भर पडली.
जमावाकडून मदतीसाठी धावलेले पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगड, विटा व काचेच्या बाटल्यांचा मारा केला गेला. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील हे दगडफेकीत जखमी झाले होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना गटारीत पाडून जमावाकडून मारहाण केली गेली होती. पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे काही जवान यात जखमी झाले होते. घटनास्थळी आलेले तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या वाहनालाही जमावाकडून लक्ष्य करण्यात आले होते. बिथरलेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता.
एका व्यावसायिकाने बराच वेळ उभ्या असलेल्या बेवारस दुचाकीबद्दल पोलिसांना माहिती दिल्याचे सांगितले जात होते. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. या व्यावसायिकाला संशय आल्याने त्याने शेजारीच असलेल्या चहाच्या दुकानावरील मुलाला चौकीतील पोलिसांना बेवारस दुचाकीबद्दल कल्पना देण्यास सांगितले होते. नंतर हा व्यावसायिक कामानिमित्त तिथून बाहेर पडला. त्यातील गांभीर्य कळाले नाही म्हणून अथवा कामाच्या गडबडीत या मुलाकडून पोलिसांना त्याची कल्पना देण्याचे राहून गेले होते. या व्यवसायिकानेच या वस्तुस्थितीचा उलगडा नंतर केला होता. आता न्यायालयीन निकालात तर या दुचाकीच्या माध्यमातून स्फोटकांची पेरणी झाली, हे देखील सिद्ध होऊ शकलेले नाही.