जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कोठडीत असताना कोल्हे यांना खास वागणूक देण्यात यावी म्हणून पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आणला गेल्याची चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे.

माजी महापौर कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर बेकायदेशीर कॉल सेंटर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला. कोल्हे यांच्यासह आठ संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. या धडक कारवाईने पोलिसांना शाबासकी मिळाली. मात्र, आता या प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर नवे आरोप झाले आहेत. कोठडीत असताना माजी महापौर कोल्हे यांना खास वागणूक दिल्याचा आणि त्यांच्याशी संबंधित कॉल सेंटर इतके दिवस त्यांच्या कार्यक्षेत्रात चालू असतानाही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निरीक्षक गायकवाड यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्याचे आदेश सुद्धा काढले आहेत. यामुळे पोलीस खात्यातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शहरालगत चालणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर कोल्हे यांना अटक झाल्यामुळे शिवसेनाही (एकनाथ शिंदे) अडचणीत सापडली आहे. विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पक्षातील एक मोठा पदाधिकारी पोलिसांच्या तावडीत अडकल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मंत्री पाटील यांना खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हटले जाते. सत्तेत सहभागी असताना सत्तेतील नेत्यांवर टीका करण्यासही ते बऱ्याच वेळा मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्यासमोर विरोधकांची तर अजिबात खैर नसते. असे असताना, पक्षाच्या माजी महापौराला बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटक झाल्यापासून त्यांची आक्रमता कमी झाली आहे. घडल्या प्रकाराविषयी कोणतेच भाष्य त्यांनी आतापर्यंत केलेले नाही किंवा आपल्या पक्षाची भूमिका देखील स्पष्ट केलेली नाही.

दरम्यान, माजी महापौर कोल्हे पोलीस कोठडीत असताना त्यांची चांगली सोय ठेवण्यात यावी म्हणून राजकीय वजन वापरण्यात आले. त्यासाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना एका मोठ्या राजकीय व्यक्तीने फोन केल्याचेही सांगितले जाते. वरून फोन आल्यानंतर कोल्हेंची बडदास्त राखण्यात पोलिसांनी कोणतीच कसर ठेवली नाही. मात्र, सगळा भांडाफोड झाल्यानंतर एकूण सर्व प्रकरण आता पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या अंगावर आल्याचे दिसत आहे. या वादानंतर कोल्हे यांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलविण्यात आले आहे. तिथेही त्यांना तालुका पोलीस ठाण्याप्रमाणे वागणूक मिळू नये म्हणून प्रशासन डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे.