जळगाव – दहशतवादी कृत्यांच्या विरोधातील खटल्यांमध्ये मी सातत्याने सीमापार दहशतवाद शब्दाचा उल्लेख करत असे. जळगावतही दहशतवाद कमी नाही; मात्र, तो राजकीय दहशतवाद आहे. बाहेर त्यासाठीच जिल्हा ओळखला जातो, असे वक्तव्य राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम येथे केले. दोन मातब्बर नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या वादानंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असताना ॲड. निकम यांनी त्याविषयी थेट भाष्य केल्याने व्यासपीठावरील मंत्री, खासदार आणि आमदार अवाक झाले.
राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ॲड. निकम यांचे रविवारी जळगावमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने सायंकाळी उशिरा त्यांचा भव्य नागरी सत्कार सुद्धा करण्यात आला. हा सत्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना ॲड. निकम यांनी जनतेचे आभार मानले. त्यासोबतच जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. विकास हा सर्वांचा समान हेतू असावा. त्यासाठी राजकीय मतभेद, हेवेदावे आणि वैयक्तिक भांडणे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार ॲड.निकम हे चौफेर फटकेबाजी करत असताना व्यासपीठावर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावळ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, किशोर पाटील, सत्यजित तांबे आणि अमोल पाटील उपस्थित होते, हे विशेष. राजकारण्यांमधील वादामुळे जळगाव जिल्हा बाहेर बदनाम होत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधल्यानंतर लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय मतभेद असले तरी मनाची श्रीमंती तितकीच आहे, असे बोलून नंतर त्यांनी सारवासारव केली. राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आपल्याला आवर्जून शुभेच्छा दिल्याचे सांगितले.
ॲड.निकम यांनी व्यासपीठावर उपस्थित भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांना तणावाच्या परिस्थितीतही चेहऱ्यावर हास्य कायम ठेवण्याचा सल्ला दिला. हास्याने एकावेळी अनेकांना मारता येते, अशीही मिश्किल टिप्पणी केली. राज्यसभेचा खासदार झालो असलो, तरी मी पांढरे कपडे परिधान केलेले नाहीत. माझ्या अंगावरील कोट अजुनही कायम आहे. कारण, मी राजकारणी झालो असलो तरी माझी भूमिका अजिबात विसरलेलो नाही. माझ्या मूळ भूमिकेपासून मी कधीच लांब जाणार नाही. राजकारणासोबत माझा वकीली व्यवसाय यापुढेही सुरू राहणार राहील. राज्यसभेचा खासदार असल्याने संपूर्ण देश माझा मतदारसंघ आहे. आणि त्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.