नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने यापूर्वी स्थापलेल्या जिल्हास्तरीय समितीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तत्कालीन पालकमंत्री दादा भूसे हे सहअध्यक्ष होेते. नव्या महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदास इतके महत्व आले की, तीनही पक्षांच्या सुप्त संघर्षात तो पेच सुटला नाही. या काळात कुंभमेळा प्राधिकरण स्थापन झाले. नुकतेच समित्यांचे पूनगर्ठन झाले. नव्याने स्थापलेल्या कुंभमेळा मंत्री समितीत विद्यमान शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली. पालकमंत्री पदासाठी आग्रही राहिलेल्या शिंदे गटाच्या दादा भुसे यांची ही एकप्रकारे पदानवती मानली जाते.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कुंभमेळा नियोजनासाठी राज्यस्तरीय दोन आणि जिल्हास्तरीय दोन अशा एकूण चार समित्या स्थापन झाल्या होत्या. तेव्हाही समित्यांवर भाजपचा प्रभाव होता. सिंहस्थाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद पालकमंत्री या नात्याने तेव्हा दादा भुसे यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना डावलून ते तत्कालीन ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांना मिळाले होते. या समितीत तत्कालीन पालकमंत्री भुसे हे सहअध्यक्ष होते.
नव्या महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच झाली. जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार असणारा राष्ट्रवादी अजित पवार गट, पाच आमदार असणारा भाजप आणि दोन आमदार असणारा शिंदे गट अखेरपर्यंत आग्रही राहिला. शिंदे गटाच्या विरोधामुळे गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. आठ ते नऊ महिन्यांपासून पालकमंत्रीपदाचे घोंगडे भिजत पडले आहे.
नुकतीच शासनाने कुंभमेळ्याच्या विविध समित्यांचे सदस्य आणि कार्यकक्षेत दुरुस्ती केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती पुर्नगठीत करण्यात आली. तर नव्याने कुंभमेळा मंत्री समितीची निर्मिती झाली. या फेरबदलात जिल्हास्तरीय समितीवर फुली मारल्याचे दिसत आहे. कारण, तिचा कुठेही उल्लेख नाही. कुंभमेळा मंत्री समितीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे आणि उदय सामंत, भाजपचे जयकुमार रावल आणि शिवेद्रसिंह भोसले हे सदस्य म्हणून काम करतील. समितीत पालकमंत्री पदाच्या स्पर्धेतील चार मंत्र्यांना स्थान मिळाले. परंतु, समितीचे नेतृत्व मंत्री महाजन यांच्याकडे आहे. पालकमंत्री पदाच्या संघर्षात शिवसेना शिंदे गट मागील जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्षपद गमावून बसल्याचे दिसत आहे. त्या समितीत सहअध्यक्ष असणारे मंत्री दादा भुसे हे आता कुंभमेळा मंत्री समितीत निव्वळ सदस्य असणार आहे. या समितीत तीन मंत्री नेमून भाजपने वर्चस्व राखले आहे.