नाशिक : जिल्ह्यात गोदावरीत फोफावलेल्या पानवेलींमुळे काठावरील दहापेक्षा अधिक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला की, जनावरांना देखील आता मच्छरदाणीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सायंकाळनंतर धूर केल्याशिवाय ग्रामस्थ मोकळेपणाने घराबाहेर बसू शकत नाहीत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आलेला असताना नाशिक शहराच्या खालील भागात नदीतील पानवेलींमुळे काठावरील गावांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरात सदैव दुर्गंधी असते. काठालगतच्या अर्धा किलोमीटरपर्यंत क्षेत्रात डासांनी अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे डेंग्यू आणि इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असल्याकडे माडसांगवीचे माजी सरपंच भालचंद्र गोडसे यांनी लक्ष वेधले. घरात डासप्रतिबंधक अगरबत्ती वा तत्सम उपाय योजावे लागतात. डासांचा असह्य त्रास गोठ्यातील गाई, बैल, म्हशी ही मुकी जनावरेही सहन करू शकत नाहीत. त्यामुळे जनावरांनाही मच्छरदाणीसारख्या जाळीच्या आच्छादनात ठेवावे लागते. डासांमुळे जनावरे आजारी पडतात. त्यांचे दूधही कमी झाल्याचे काहींचे निरीक्षण आहे.
अंधार पडल्यानंतर स्थानिकांना घराबाहेर बसायचे झाल्यास कडूनिंब वा तत्सम पाला जाळून धूर करणे क्रमप्राप्त ठरते. अनेक ठिकाणी पानवेलींचे इतके जाळे आहे की, गोदावरीतील पाणीही दिसत नाही. चरणारी जनावरे अनेकदा पानवेलीत अडकतात. शेतीसाठी गोदावरीचे पाणी वापरले जाते. मोटार सुरू करण्यासाठी गेल्यानंतर काठावर मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे डासांचा घोळका उडतो, असेही शेतकरी सांगतात. दूषित पाण्यामुळे औषधांची फवारणी वाढली असल्याचेही निरीक्षण आहे.
नौकानयन सरावावरही संकट
सायखेडा, चांदोरी परिसरात गोदावरी नदीत नौकानयनच्या सरावासाठी मार्गिका आहे. मागील काही वर्षात या बोट क्लबमधील अनेक नौकानयनपटू चांगल्या कामगिरीमुळे शासकीय सेवेत दाखल झाले. महाविद्यालयीन विद्यार्थी व खेळाडू दररोज सकाळी सहा वाजता या ठिकाणी सराव करतात. परंतु, पानवेलींमुळे चार महिन्यांपासून त्यांचा सराव थांबला आहे.
टँकरने नदीकाठावर पाणी
गोदावरीतील दूषित पाण्यात हात घातल्यास खास सुटते. त्यामुळे त्याचा वापर टाळला जातो. दशक्रिया विधीप्रसंगी स्नान, हात-पाय धुण्यासाठी गोदावरीचे पाणी वापरण्यास कोणी धजावत नाही. अशाप्रसंगी गोदा काठावर पाण्याचा टँकर बोलावून विधी उरकले जातात. ग्रामपंचायत या विधींसाठी टँकरने पाणी उपलब्ध करते, असे सायखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य अश्पाक शेख यांनी सांगितले.
वर्षभरापासून जिल्ह्यात मलेरिया नाही. चालू वर्षीही त्याचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच विशिष्ट एखाद्या भागात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आढळत नाही. -डॉ. राजेंद्र बागूल (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी)