मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे अडचणीत सापडलेल्या मालेगाव येथील माजी मंत्री प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतील १७ कोटी ७४ लाखाच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हिरे कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे. रिना गोसावी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार माजी आमदार अपूर्व हिरे, योगिता अपूर्व हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, स्मिता हिरे, राजेश शिंदे, संतोष घुले आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रिना या हिरे कुटुंबीयांच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या मानूर तालुका कळवण येथील जनता विद्यालयातील बडतर्फ शिक्षक संतोष गोसावी यांच्या पत्नी आहेत.
योगिता हिरे या महिला विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये हिरे कुटुंबीय विश्वस्त व पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सन २१ मध्ये पती संतोष गोसावी यांच्या नावाने महिला बँकेतून ११ लाखाचे कर्ज संशयीतांनी बेकायदेशीरपणे मंजूर केले व दमदाटी करत त्याचा वापर स्वतःसाठी केला. तसेच याच प्रकारे शिक्षण संस्थांमधील अन्य कर्मचाऱ्यांच्या नावाने या बँकेतून बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आल्याचे रिना यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या बँकेत महिला सभासद असताना पुरुषांच्या नावाने कर्ज प्रकरणे करणे तसेच विनातारण, अतिरिक्त तारण व विनियोग दाखले न घेता तसेच मर्यादाबाह्य पद्धतीने कर्ज प्रकरणे करण्यात आली. त्यासाठी अनेक अर्जदारांच्या कर्ज प्रकरणांवर बनावट सह्या करण्यात आल्या आहेत. मंजूर झालेल्या कर्जांच्या रकमा हिरे कुटुंबीयांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक फर्मच्या खात्यात वर्ग झाल्या असून काही कर्जदारांचे हप्ते हिरे कुटुंबीयांच्या व्यावसायिक फर्मच्या खात्यातून भरण्यात आली आहेत. अशा प्रकारे कर्ज मंजूर केलेली अनेक कर्जखाती अनुत्पादित कर्ज (एनपीए) सदरात गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक ताशेरे ओढण्यात आले असून अनेक बेकायदेशीर व गंभीर बाबी आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १३ कर्जदारांनी आपण या बँकेतून कर्ज घेतल्याचे अमान्य केले आहे. नमूद २५७ कर्ज प्रकरणांद्वारे १७ कोटी ७४ लाख ७५ हजार १५७ रुपयांचा अपहार झाल्याचे रिना यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी हिरे कुटुंबीयांच्या विरोधात बँक घोटाळ्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. नाशिक जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी अद्वय हिरे यांना नऊ महिने तुरुंगात काढावे लागले. मालेगाव येथील व्यंकटेश सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज अद्याप प्रलंबित आहे. या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते याची प्रतीक्षा असतानाच महिला बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाल्याने हिरे कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत.