नाशिक : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ई पारपत्राचे उत्पादन नाशिकरोडच्या भारतीय प्रतिभूती मुद्रणालयात (आयएसपी) करण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यासाठी आयएसपी मजदूर संघातर्फे नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला होता. त्याला यश आले आहे. या वर्षांसाठी ७० लाख ई पारपत्र बनविण्याचे काम आयएसपीला मिळाले आहे. हे काम ३१  मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करून द्यायचे आहे. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती दिली. ई पारपत्रासाठी मंजूर झालेल्या नवीन यंत्रणेचे कामही लवकरच सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटांची छपाई करणा-या नाशिकरोडच्या चलार्थ मुद्रणालयात कोमोरी इंटेग्लिओ, फिनिशींग आणि बीपीएस या आधुनिक यंत्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे. मंजूर झालेल्या दोन इंटिग्लिओ, दोन न्यूमोरोटा, दोन फिनिशिंग, तीन ऑफसेट आणि दोन बीपीएस या नवीन यंत्रांची उभारणी करण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. दोन्ही मुद्रणालयांमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन नवीन कामाची मागणी कितीही वाढून आली तरी दर्जा टिकवून आणि वेळेत काम करण्यासाठी आयएसपी तसेच सीएनपीमधील कामगार सज्ज असल्याचे गोडसे यांनी सांगितले. भारतात ई पारपत्र प्रथमच तयार होणार आहेत. याशिवाय पारंपरिक पद्धतीच्या पारपत्रांचे कामही जोमाने सुरू आहे. भारतात पारपत्रांची छपाई फक्त नाशिकमध्येच होते. ई पारपत्राचे काम मिळाल्याने दोन्ही मुद्रणालयातील कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, जयरामु कोठुळे, कार्तिक डांगे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Printing house in nashik working on preparing lakh e passports zws
First published on: 14-07-2022 at 00:57 IST