जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील डाळिंबी उर्फ प्रियंका रवींद्र सरोदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) ओबीसी प्रवर्गातून राज्यात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिने आई-वडिलांसह गावाचे नाव मोठे केले असून, या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या मुला-मुलींमध्येही अपार प्रतिभा आणि जिद्द असते. त्यांना योग्य दिशा आणि वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्यास ते देखील जीवनात मोठ्या उंचीवर झेप घेऊ शकतात. अशा प्रेरणादायी विद्यार्थ्यांपैकी एक नाव म्हणजे डाळिंबी सरोदे. डाळिंबी ही रावेर तालुक्यातील रोझोदा या छोट्याशा पण प्रगतीशील गावाची लेक असून, शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे तिला बालपणापासूनच श्रम, शिस्त आणि चिकाटीचे धडे घरातून मिळाले. आई-वडिलांनी आर्थिक अडचणी असूनही तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
डाळिंबीने पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण रोझोदा गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पूर्ण केले. अर्थात, मर्यादित शैक्षणिक साधनसामुग्री असतानाही ती नेहमीच अभ्यासात पुढे राहिली. त्यानंतर तिने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण खिरोदा येथे पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी राहुरी गाठून महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. कृषी अभियांत्रिकी शाखेत बी. टेकची पदवी संपादन केली. कृषी क्षेत्राची असलेली आवड आणि शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी यामुळे तिने ते क्षेत्र निवडले होते. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डाळिंबीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
डाळिंबीच्या वाटचालीत तिच्या एकत्र कुटुंबाचा मोठा वाटा आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि तिची स्वतःची चिकाटी, या त्रिसूत्रीनेच तिला उंच भरारी घेण्याचे बळ दिले. आज डाळिंबी सरोदे ही ग्रामीण भागातील अनेक तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. परिस्थिती नव्हे तर दृष्टिकोन आणि मेहनत हेच यशाचे खरे सूत्र असते, हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. परिस्थिती कितीही कठीण आणि प्रतिकूल असो, जर ध्येय स्पष्ट असेल तर कठोर परिश्रमातून यश नक्कीच मिळते. डाळिंबीने २०२२ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षांवर लक्ष्य केंद्रीत केले. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर गेल्याच वर्षी तिची पुरवठा निरीक्षक म्हणून रावेर तहसील कार्यालयात नियुक्ती झाली होती. तेवढ्यावरच समाधानी न राहता तिने आणखी अभ्यास वाढवला. त्याचेच फळ म्हणून तिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आता यश घवघवीत यश मिळाले आहे. आपले पुढील लक्ष्य केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे.
