‘भाजयुमो’ युवती विभागाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

नाशिक : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महविकास आघाडी सरकारने घाईघाईने संमत करून घेतले. या माध्यमातून कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार असल्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभागाच्या वतीने येथे आंदोलन केले. निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली. आंदोलन करणाऱ्या युवती विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकामुळे विद्यापीठांना राजकीय अड्डा बनविण्याचा महाआघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या यात आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परीक्षेप्रमाणे भ्रष्टाचार होईल, अशी भीती भाजयुमोतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने भाजयुमो शहराध्यक्ष मनिष बागुल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना नाशिक शहरातून पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, यासाठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सोमवारी भाजयुमो युवती विभाग नाशिक महानगराच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर सकाळी निषेधाची काळी रांगोळी काढण्यात आली. यावेळी भाजयुमो शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, हा निषेध नोंदविणे पदाधिकाऱ्यांना चांगले महागात पडले आहे. महानगर सरचिटणीस आहेर, युवती शहराध्यक्ष साक्षी दिंडोरकर, संदीप दिंडोरकर यांच्यासह पहाटे फिरायला गेलेल्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.