नंदुरबार : मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या शिक्षकाला डॉक्टरांसमोरच ह्रदयविकाराचा झटका आला. एकच गोंधळ उडाला. बेशुद्ध झालेल्या शिक्षकाला डॉक्टरांनी तातडीने सीपीआर दिल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील एका खासगी रुग्णालयात घडली. यासंदर्भातील काळजाचे ठोके चुकविणारी चित्रफीत सध्या समाज माध्यमात फिरत आहे. कुणाचे नशीब कोणाला कुठल्या वेळेला कुठे घेवून जाईल, हे सांगता येत नसल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.

आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नेमसुशील विद्यामंदिर या शाळेत कार्यरत रवींद्र गुरव हे आपल्या आजारी मुलीला शहरातील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. योगेश्वर चौधरी यांच्याकडे तपासणीसाठी घेवून गेले होते. ते डॉक्टरांसमोरील खुर्चीवर बसले होते. शेजारीच त्यांची मुलगी आणि पत्नी उभी होती. अचानक त्यांनी डॉक्टरांच्या टेबलावर डोके ठेवले. काही क्षण कोणाला काहीच समजले नाही. नंतर त्यांनी शरीराला झटका दिल्याने ते बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉ. चौधरी यांनी क्षणाचाही बिलंब न करता त्यांना तत्काळ खुर्चीवरुन खाली झोपविले.

तपासणीवेळी गुरव यांचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने सीपीआर उपचार पद्धती सुरु केली. थोडावेळ सीपीआर दिल्यानंतर शिक्षक रवींद्र गुरव बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आहे. यानंतर त्यांच्यावर तातडीने रुग्णालयातच उपचार करण्यात आले. या अचानक उदभवलेल्या प्रसंगामुळे त्याच्यासमवेत असलेले त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्वच जणांची चांगलीच धावपळ उडाली होती.

परंतु, या अतीसंवेदनशील प्रसंगी डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य उपचार पद्धती, यामुळे शिक्षकाचे प्राण वाचले. तंत्रस्नेही म्हणून ओळख असलेले शिक्षक रवींद्र गुरव हे आपल्या मुलीच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाणे काय, आणि डॉक्टरासमोरच त्यांना ह्रदयविकाराचा झटका येण, याची तळोदा शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या घटनेनंतर ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर योग्य सीपीआर पद्धत किती आवश्यक असल्याचे तेही अधोरेखीत झाले. योग्य प्रशिक्षण घेवून योग्य वेळी या सीपीआर पद्धतीचा अवलंब केल्यास रुग्णाचे प्राण कशा पद्धतीने वाचविता येतात, याची प्रचिती या घटतून समोर आल्याने तळोदा शहरात अशा पद्धतीने सीपीआरची कार्यशाळा घेण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी काहींनी पुढाकार देखील घेतल्याचे दिसून येत आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमधून सीपीआर संदर्भात कार्यशाळा घेण्याची आवश्यकता असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. सामाजिक संघटना आणि संस्थांनीही त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची गरज आहे.