नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, अतिशय व्यापक स्वरुपात विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. काही कामांना दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यास विलंब होऊ नये म्हणून राज्य सरकारने तत्परतेने सुमारे साडेसात हजार कोटींचा निधी वितरित केला. अनेक कामांच्या निविदा अंतिम होऊन कार्यारंभ आदेश दिले गेले. परंतु, त्यांचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. पावसाळा संपूनही सुरु असलेला पाऊस त्याचे कारण आहे.
गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने २५ हजार ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. आगामी कुंभमेळ्यास त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी तर, नाशिकमध्ये २४ जुलै २०२७ रोजी ध्वजवंदनेने प्रारंभ होईल. याचा विचार केल्यास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जवळपास १८ महिने तर, त्र्यंबकेश्वरमध्ये त्याहून कमी कालावधी आहे. हे लक्षात घेत यंत्रणेने अधिक कालावधी लागणारी कामे युद्ध पातळीवर सुरू करण्याचे नियोजन केले.
सरकारने मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, घाट बांधणी, उपसा सिंचन योजना, सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक कामांना मान्यता देत भरीव निधी कुंभमेळा प्राधिकरणास उपलब्ध केला. सप्टेंबरनंतर पाऊस निरोप घेईल आणि चार, पाच महिने रखडलेली कामे जलदगतीने सुरू करता येतील, असा यंत्रणेचा अंदाज होता. त्यासाठी पावसाळ्यात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले गेले. मात्र प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात नैसर्गिक अडथळे कायम आहेत. सप्टेंबर अखेरीस पाऊस निरोप घेतो. पुढे ऑक्टोबर हिटचे चटके बसू लागतात. परंतु, यंदा तसे फारसे काही घडले नाही. अधुनमधून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुंभमेळ्याच्या कामांत अडचणी कायम आहेत.
या संदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी मनपाचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे महत्वाचे काम जुलै २०२५ मध्ये सुरू झाल्याचे नमूद केले. त्यास वेळ लागणार आहे. अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. या आठवड्यापर्यंत पाऊस पूर्णपणे उघडलेला नाही. तरिही ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली, ती कामे १० ते १५ दिवसांत सुरू केले जातील. सार्वजनिक बांधकाम विभागासह मुकणे धरणातून पाणी पुरवठ्याचा प्रकल्प अशा अनेक कामांना सुरुवात झाली आहे. शहरात एकाचवेळी रस्ते, सांडपाणी, पाणी पुरवठा, ऑप्टिकल फायबर, सीसीटीव्ही अशी चार ते पाच कामे समांतरपणे सुरू होतील. कुंभमेळ्याची लहान-मोठी सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत मार्च २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेली जातील, असे आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
