जळगाव – पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) एकत्रित मोर्चा काढणार आहेत. याविषयी विविध पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली असली तरी सत्ताधारी महायुतीत सहभागी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) याविषयावरुन कोंडी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजपचा त्यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले जात असताना प्रथमच शिंदे गटाच्या एका मंत्र्याने याविषयी मतप्रदर्शन केले आहे.

पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे दोन्ही पक्ष मुंबईत संयुक्तपणे मोर्चा काढणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आमचा कोणाला विरोध थोडीच आहे. मराठी ही आमची भाषा आहे आणि ती आम्ही मान्य करतो, असे मत शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे मांडले. तसेच हिंदीबाबत सामूहिक निर्णय झाला पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे गट आणि मनसे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पाच जुलै रोजी संयुक्त मोर्चाही काढण्यात येणार आहे. त्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जळगावात आपले मत व्यक्त केले. मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाला विरोध नसल्याचे मांडतानाच हिंदीच्या बाबतीतही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, हिंदीच्या विरोधात राज्याचे वातावरण तापलेले असताना, विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला चांगलेच लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत, अशी टीका केली आहे, राऊत यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे हे तर तुझ्या छाताडावर बसले आहेत सोन्या, अशी एकेरी भाषा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वापरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यातील शाळांमधील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याने महाराष्ट्रद्रोहींचा जळफळाट झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केल्यानंतर, त्या महिला आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या आहेत. नाहीतर मी असे भारी उत्तर दिले असते ना त्यांनी विचारच केला असता, असा खोचक टोला मंत्री पाटील यांनी त्यांना हाणला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची राज्यात चर्चा सुरू असली तरी ते आताही एकत्रच असल्याचा दावा मंत्री पाटील यांनी केला.