नाशिक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी सणाचे औचित्य साधून गुरुवारी शहरात २० ठिकाणी गणवेशात स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन उत्साहात पार पडले. यामध्ये शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा समावेश होता. भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. शिवाय, अन्य पक्षांमधून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेली काही नेतेमंडळी आवर्जुन या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. यंदाच्या विजयादशमी उत्सवाचे वेगळेपण म्हणजे संघाने पहिल्यांदा शहरातील सर्व म्हणजे १५४ वस्त्यांमध्ये शस्त्रपूजन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार विजयादशमीच्या दिवशी शहरातील गंगापूर रोड, इंदिरानगर, मखमलाबाद, अमृतधाम, पंचवटी, भद्रकाली, रविवार कारंजा, सातपूर, सिडको, जेलरोड, नाशिकरोड, भगूर, देवळाली, आणि अन्य भाग अशा एकूण २१ नगरांमध्ये २० ठिकाणी गणवेशात स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन झाले. यामध्ये साडेचार हजार स्वयंसेवक सहभागी झाल्याचा अंदाज आहे. पथ संचलनावेळी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. घोष वादनाच्या निनादात निघालेले संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही भागात सकाळी तर, काही भागात संध्याकाळी पथसंचलन झाल्याची माहिती संघाचे जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य यांनी दिली. शताब्दी वर्षामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. स्वयंसेवकांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाची चुणूक संचलनात अधोरेखीत झाली.
विजया दशमीचे औचित्य साधून संघातर्फे शहरातील विविध १५४ वस्त्यांमध्ये शस्त्रपूजन पार पडले. याआधी हा कार्यक्रम १५ ते २० ठिकाणी होत असे. यावर्षी तो प्रत्येक वस्तीपर्यंत नेण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी इंदिरानगरमध्ये बालकांचे संचलन झाले होते. गुरुवारी पथसंचलन आणि शस्त्रपूजन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचे कार्यवाह वैद्य यांनी नमूद केले. यामध्ये इस्कॉनचे नृसिंहकृपादास प्रभू, गोविंदकुमार झा, विठ्ठल देवरे, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, प्राचार्य डॉ. प्रशांत मालपुरे, राजेंद्र कदम आदींचा समावेश होता.
संघाच्या सहा विभागात होणाऱ्या कार्यक्रमात बुथ प्रमुख ते माजी नगरसेवकांपर्यंत सर्वांना आपापल्या भागात सहभागी होण्यास कळविण्यात आले होते, असे भाजपचे महानगरप्रमुख सुनील केदार यांनी सांगितले. कोण, कुठे सहभागी झाले, याची स्पष्टता अद्याप झालेली नसल्याचे ते म्हणाले. अलीकडेच शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) भाजपमध्ये दाखल झालेले सुधाकर बडगुजर, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर हे सिडकोतील पथसंचलन कार्यक्रमात उपस्थित होेते. सावतानगर येथे स्वयंसेवकांवर त्यांनी पुष्पवृष्टी केली. विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील पथ संचलनात मनसे, ठाकरे गट असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झालेले माजी महापौर अशोक मुर्तडक सहभागी झाले होते. ठाकरे गटातून दीड ते दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले सुनील बागूल मात्र या कार्यक्रमांत कुठेही दिसले नाही. वेगवेगळ्या भागात झालेल्या कार्यक्रमांत राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.