नाशिक – नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले कळसुबाई शिखरावर आयुष्यात एकदा तरी चढाई करावी, अशी प्रत्येक दुर्गप्रेमीची इच्छा असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांमुळे ते जमेलच असे नाही. परंतु, इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी २९ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसुबाई शिखरावर अखंडितपणे जाण्याची परंपरा यंदाही पाळली. उल्लेखनीय म्हणजे २९ वर्षात नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक कांरणांमुळेही शिखरावर या मित्रमंडळाकडून चढाई केली जात असल्याने आजपर्यंत २९ वर्षात ३६१ वेळा कळसुबाईच्या शिखरावर चढाईचा विक्रम कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील १५० युवकांनी केला आहे.
१९९७ मध्ये घोटी (ता.इगतपुरी) येथील भागीरथ मराडे आणि त्यांच्या दोन मित्रांनी कळसुबाई शिखरावर चढाईची परंपरा चालू केली. त्यांचा आदर्श घेत आता मंडळाच्या २९ व्या वर्षात १५० ते २०० युवक या कार्यात सहभागी झाले. या युवकांच्या कार्याची दखल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही घेतली होती. त्यांचे कौतुक केले होते. याशिवाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. या अनोख्या धाडसी उपक्रमात शिखरप्रेमी, शिवप्रेमी, गडप्रेमी असलेल्या कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, बाळू आरोटे,अशोक हेमके, सोमनाथ भगत, भगवान तोकडे, कैलास नवले आदींसह शेकडो गिर्यारोहक सहभागी होतात. इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील उपक्रम हा सर्वसामान्यांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. आजचा तरुण व्यसनाधीन झाल्याचे म्हटले जाते. मात्र घोटी शहरातील १५० ते २०० युवक कळसूबाई शिखरावर नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यत्न दररोज चढाई करतात. आलेल्या भाविकाना मदत करतात.
या कार्याविषयी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणतीही यात्रा,उत्सव धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यकम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर चढाई करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्रमात मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखणे सुरु झाले. स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तसेच आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य मंडळाकडून केले जात आहे. यापुढेही हा उपक्रम कायम चालू राहील, असे मराडे यांनी सांगितले.