जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह अन्य संशयितांना यापूर्वी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाकडून त्यांच्या कोठडीत शनिवारी पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे नखाते यांनी २८ सप्टेंबरला एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

दरम्यान, पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सर्व संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर चार तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. आधीच्या कोठडीची मुदत संपल्यावर सर्व संशयितांना शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्ह्यातील अन्य मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने आठ तारखेपर्यंत कोल्हे यांच्यासह इतरांची पोलीस कोठडीत रवानगी केली. त्यावर संशयितांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी या पूर्वीच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय केले, त्याची माहिती देण्याची मागणी केली. कोल्हे हे माजी महापौर असल्याने त्यांना बोगस बोगस कॉल सेंटर प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.

यापूर्वी, विविध प्रकरणांवरून माजी महापौर ललित कोल्हे यांच्या विरोधात पोलिसांत दाखल गुन्ह्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यात आता पुन्हा संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत दाखल गुन्ह्याची भर पडली आहे. संबंधितांकडून कॅनडासह इतर देशातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केलेल्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून वळविलेल्या पैशांतून आधी क्रिप्टो करन्सी खरेदी केली जात असे. त्यानंतर क्रिप्टो करन्सीचे भारतीय चलनात रूपांतर करून तो पैसा थेट हवालामार्गे मुख्य संशयितांकडे मुंबईत पाठविण्याची व्यवस्था असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या परदेशी नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही जळगाव पोलिसांकडून केला जात आहे.