नाशिक – विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणारे डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी निधन झाले. नारळीकर हे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ होते. त्यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे संबंध होते. शहर परिसरातील विविध साहित्य, संस्कृती संस्था, साहित्यिक, लेखकांसह शैक्षणिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी मौल्यवान ठरले.

नाशिकमध्ये भरविण्यात आलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते संमेलनास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांची खुर्ची रिकामी ठेवत भाषण वाचून दाखविण्यात आले होते. याविषयीची आठवण ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली.

नारळीकर यांच्या निधनाने प्रतिभावान वैज्ञानिक, प्रेरणादायी शिक्षक आणि विज्ञान प्रसारकाचा खंदा शिल्पकार गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृतीचा आरसा असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराने जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. गोदा गौरवचे दुसरे वर्ष असतांना ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्या हस्ते नारळीकर यांच्यासह पोलीस अधिकारी जी. एस. रिबेरो, नृत्यांगणा रोहिणी भाटे, कवी गुलजार यांना गौरविण्यात आले होते.

शहरातील वसंत व्याख्यानमालेत १३ मे २०१८ रोजी नारळीकर यांचे व्याख्यान झाले होते. त्यावेळी मधुकर झेंडे, चंद्रशेखर शाह, सुनील कुटे, मंगला नारळीकर हे उपस्थित होते. मागील वर्षी दि न्यु एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नारळीकर यांना अक्षय्य पुरस्कार देण्याचे ठरले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे नारळीकर यांनी पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्याने शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना पुरस्कार देण्यात आला.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर तृतीय वर्धापन दिनाच्या सोहळ्यात डॉ. नारळीकर यांची विशेष उपस्थिती होती. नारळीकर यांना संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते सर डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डाॅ. जयंत नारळीकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हितचिंतक होते. डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्र अंनिसच्या अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. फलज्योतिष हे शास्त्र आहे की नाही,हे विज्ञानाच्या निकषांवर तपासण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आयुका आणि पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग यांनी मिळून एक चाचणी घेतली होती.

मतिमंद शाळेतील शंभर मुले आणि शाळेत सतत पहिले येणारे शंभर मुले यांच्या अचूक जन्मवेळा ज्योतिषांना वा त्यांच्या संस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याद्वारे संबंधित विद्यार्थी मतिमंद आहेत की बुद्धिमान आहेत, हे सांगणे ज्योतिषांकडून अपेक्षित होते. मात्र सरासरी ५० टक्केही उत्तरे बरोबर आली नव्हती. फलज्योतिषांना आव्हान देणारी ही चाचणी घडवून आणण्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले होते.

२० ऑगस्ट २०१४ रोजी ते नाशिकला डाॅ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेसाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. साहित्य आणि भाषणांमधूनही ते वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सतत बोलत असत. त्यांच्या निधनाने अंनिसचा खंदा समर्थक गमावला असल्याची खंत अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नारळीकर विलोभनीय व्यक्तिमत्व

नारळीकर सरांचे निधन म्हणजे एका पर्वाचा अस्त आहे. खगोलशास्त्र विषयात त्यांनी जागतिक कीर्ती संपादन केली. परदेशात नोकरीच्या उत्तम संधी असूनही त्यांनी आपली मातृभूमी हीच आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यांना असामान्य बुद्धिमत्तेचा वारसा लाभला होता; तो त्यांनी अधिक समृद्ध केला. पुणे येथे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभे केलेले “ आयुका “ हे संशोधन केंद्र ही त्यांनी आपल्या देशाला दिलेली चिरंतन स्वरूपाची देणगी आहे. तेच त्यांचे खरे स्मारक आहे. ते हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे वैज्ञानिक नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेत जाऊन विज्ञान प्रसार केला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी सतत प्रयत्न केले. नारळीकर सरांनी अनेक सुंदर विज्ञान-कथा लिहिल्या. त्यामुळे या साहित्य प्रकाराचे अनेक लेखकांना आकर्षण वाटू लागले. त्यातून मराठीत अनेक चांगले विज्ञान लेखक निर्माण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेष्ठ वैज्ञानिक, उत्तम प्रशासक, कुशल प्राध्यापक, विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगणारे लेखक, वक्ते आणि एक सहृदय माणूस ही सरांची सर्व रूपे मोठी विलोभनीय होती. सरांचा वैयक्तिक सहवास लाभला हे माझे भाग्य समजतो. – डॉ. गिरीश पिंपळे ( ज्येष्ठ खगोल अभ्यासक, नाशिक)